
यवतमाळ जिल्ह्यातील माहूरजवळ कोळवण इथे एसटी बस आणि डंपरचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला आहे. एसटी बसमधून परप्रांतीय मजुरांना नागपूरला नेण्यात येत होते असे कळते आहे . हे मजूर सोलापूरमधून नागपूरकडे जात होते. नागपूरवरून मजुरांसाठी सोडण्यात येणाऱ्या विशेष गाडीतून जाण्यासाठी हे मजूर नागपूरला जात होते. मंगळवारी सकाळी साडेचार वाजता त्यांच्या बसला अपघात झाला. या अपघातामध्ये 22 जण जखमी झाले आहेत. जखमींना आर्णी आणि यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या अपघातात चालकाचाही मृत्यू झाल्याचे कळते आहे, मात्र त्याला अद्याप दुजोरा मिळालेला नाही. हा अपघात आरणी तालुक्यात झाला असून मजुरांना नेणाऱ्या बसने नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम करण्यासाठी मागवलेल्या डंपरला धडक दिल्याचे कळते आहे.


























































