
हिंगोली जिल्ह्यात छुप्या मार्गाने विक्रीसाठी आणलेला एक लाख 6 हजार 480 रुपयांचा अवैध दारुसाठा आणि इतर मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने जप्त केला. या प्रकरणी गोरेगाव व हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांनी दिली.
गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनिल दत्तराव इंगोले याच्याकडून 5760 रुपयाच्या 72 देशी दारुच्या बाटल्या व 25 हजाराची मोटार सायकल असा एकूण 30760 रुपयाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. तर मनोज धर्मराज देशमुख याच्याकडून 7680 रुपयाच्या 96 देशी दारुच्या बाटल्या व 15 हजाराची मोटार सायकल असा एकूण 22680 रुपयाचा माल पकडला आहे. तर विष्णु तुकाराम बळस याच्याकडून 11520 रुपयाच्या 144 देशी दारुच्या बाटल्या आढळल्या. हिंगोली शहर ठाण्याच्या हद्दीत रामु बताशा पवार (रा. खटकाळी), अंकुश जैस्वाल, प्रतिक जैस्वाल, शरद जैस्वाल व दुकानावर हजर राहून दारु देणारे मॅनेजर यांच्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणात 11520 रुपयाच्या 144 देशी दारुच्या बाटल्या व 30 हजाराची मोटार सायकल एकुण 41520 रुपयाचा माल पोलिसांनी जप्त केला आहे. अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत काळे, पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय किशोर पोटे, शिवसांब घेवारे, पोलीस कर्मचारी बालाजी बोके, संभाजी लकुळे, सुनील अंभोरे, आशिष उंबरकर, आडे, शंकर ठोंबरे, किशोर कातकडे, विठ्ठल कोळेकर, विठ्ठल काळे, किशोर सावंत यांच्या पथकाने ही कारवाई केली.



























































