
रत्नागिरी जिल्ह्यातील निवळी गावाजवळ असलेल्या काजूच्या बागेत एक बिबट्या शिरला होता. या बिबट्याला हातात कोणतंही हत्या नसताना झडप घालून एका धाडसी वनक्षेत्रपालाने पकडलं आहे. राजेंद्र रावसाहेब पाटील असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. या बिबट्याला पकडण्यापूर्वी त्याने पाटील यांच्यासोबत असलेल्या प्रियंका लगड या वनक्षेत्रपालांना जखमी केलं होतं. हा प्रकार शुक्रवारी संध्याकाळी सव्वाचारच्या सुमारास घडला होता.
या बागेत बिबट्या घसल्याचे कळाल्यानंतर हे दोन्ही वनक्षेत्रपाल घटनास्थळी पोहोचले होते. सोबत दोन स्थानिकांना घेऊन ते बागेत शिरले. प्रियंका लगड या एका स्थानिकासह पुढे होत्या आणि पाटील आणि दुसरा स्थानिक पाठी होते. अचानक बिबट्याने लगड यांच्यावर हल्ला केला आणि त्यांच्या पायाला चावला. राजेंद्र पाटील यांनी बिबट्याला हुसकावण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे बिबट्याने लगड यांच्याऐवजी त्यांच्याकडे मोर्चा वळवला. त्याने उडी मारण्याच्या आत राजेंद्र पाटील यांनी बिबट्यावर झडप घातली. बिबट्याची मान त्यांनी हाताने पकडली होती, ज्यामुले तो चावू शकत नव्हता. मात्र त्याच्या पायांची नखे त्यांना जखमी करू शकत होती. यावेळी वनरक्षक आकाश कडूकर आणि स्थानिकांनी बिबट्याचे चारही पाय घट्ट पकडले. या झटापटीत पाटील यांना बिबट्याच्या नखांचे ओरखडे बसले. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी दोरी नसल्याने पाटील यांनी स्वत:चा शर्ट काढला आणि त्याने बिबट्याचे पाय बांधले. दुर्दैव असे की या झटापटीमध्ये धक्क्याने बिबट्याचा मृत्यू झाला.
राजेंद्र पाटील यांनी या घटनेबाबत बोलताना सांगितले की कोईंबतूर इथे प्रशिक्षण घेत असताना तुमच्याकडे ज्यावेळी कोणतीही साधने नसतात तेव्हा शरीरावर असलेल्या गोष्टींचा तुम्ही कसा वापर करू शकता हे शिकवण्यात आलं होतं. ते शिक्षण कामी आल्याचं त्यांनी सांगितलं. पाटील यांना बिबट्याला वाचवू शकलो नाही याचे भयंकर दुःख झाल्याचेही त्यांनी सांगितले.























































