शेतकऱ्यांना तातडीने सातबारा देण्यासाठी तलाठी चढले गच्चीवर…वाचा सविस्तर…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खरीप हंगाम तोंडावर असताना बी-बियाणे, खते खरेदीसाठी खिशात दमडी नाही, अशी शेतकऱ्यांची अवस्था असल्याने त्यांना पिककर्ज काढल्याशिवाय पर्याय नाही. त्यासाठी सातबारा उतारे आणि संबधित कागदपत्रे ऑनलाईन काढण्यासाठी तलाठी कार्यालयामध्ये शेतकऱ्यांची तुफान गर्दी होत आहे, असे चित्र जवळपास सर्वच ठिकाणी आहे. मात्र, काही ठिकाणी इंटरनेटला रेंज नसल्याने शेतकऱ्यांचे काम अडल्याने ते हतबल झाले. मात्र, वडवणी तालुक्यातील साळिंबा येथील तलाठी भूषण शांताराम पाटील यांनी शेतकऱ्यांची अडचण समजून घेतली. तसेच शेतकऱ्यांना तातडीने कागदपत्रे मिळणे गरजेचे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे इंटरनेटची रेंज मिळवण्यासाठी पाटील थेट गच्चीवर चढले आणि शेतकऱ्यांची कामे कोळंबू नये, यासाठी गच्च्वीर बसूनच काम केले.

शेतकऱ्यांसाठी तळमळ असणारे प्रशासन असले तर सर्व समस्यांतून मार्ग निघू शकतो. शेतकऱ्यांना तातडीने ऑनलाईन सातबारा देण्यासाठी वडवणी तालुक्यातील साळिंबा येथील तलाठी भूषण पाटील गच्चीवर चढले. लॅपटॉपला रेंज आली आणि शेतकऱ्यांना ऑनलाईन सातबारा झटपट मिळू लागले. मूळ जळगाव जिल्ह्यातील एका शेतकरी परिवारातील असलेले पाटील वडवणी तालुक्यामध्ये आपल्या कामाच्या आगळ्यावेगळ्या हातोटीमुळे चर्चेत असतात. शेतकऱ्यांसाठी ते नेहमी तत्परतेने काम करतात. पाटील यांच्या कामाची पद्धत शेकडो शेतकऱ्यांनी अनुभवली आहे. पिककर्ज काढण्यासाठी सातबाराची ऑनलाईन प्रत आवश्यक असते. पेरणीची लगबग लवकरच सुरू होईल. त्यापूर्वी सातबारा हातात पडून पिककर्जासाठी अर्ज करण्याची धावपळ सुरू असताना नेमकी तलाठी सज्जा कार्यालयात नेटला रेंज येत नव्हते. त्यामुळे ऑनलाईन सातबारा निघणे अशक्य झाले. शेतकऱ्यांचा खोळंबा होऊ नये, यासाठी तलाठी पाटील यांनी नामी शक्कल लढवली. ते थेट ऑफिसच्या गच्चीवरच चढले. ऑफिसच्या गच्चीवर गेल्यावर कशीबशी रेंज आली आणि शेतकऱ्यांच्या सातबारा झटपट निघू लागल्या. पाटील यांच्या या कामामुळे सोशल डिस्टन्सिंगही पाळले गेले आणि शेकऱ्यांचाही खोळंबा झाला नाही.