विद्यार्थ्यांसाठी ‘शिफ्ट’ पद्धती वापरुन शाळा सुरू करा; शिक्षणतज्ज्ञांची सूचना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगभरात कोरोना थैमान घालत आहे. देशात आणि राज्यातही कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे मार्च महिन्यापासून लॉकडाऊन घेण्यात आला होता. आता लॉकडाऊनचे निर्बंध शिथील करण्यात येत आहेत. सोमवारपासून अनेक खासगी कार्यालयेही सुरू करण्यात येणार आहेत. मात्र, शाळा कधी सुरू होणार याबाबत अनिश्चितता आहे. शाळा कधी सुरू होणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. शाळा ऑगस्ट महिन्यानंतर सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, आता शाळा सुरू झाल्या तरी कोरोनाच्या संकटामुळे आपल्याला शिक्षण पद्धतीत बदल करावे लागतील, अशा सूचना संशोधकांनी आणि तज्ज्ञांनी केल्या आहेत. आता शाळा सुरू झाल्या तर शाळांनी शिफ्ट पद्धतीचा विचार करून वर्ग भरवावे, अशी सूचना ज्य्षेठ संशोधक व्ही. के. सारस्वत यांनी केली आहे. ते डीआरडीओचे माजी संचालक आहेत. शिफ्ट पद्धतीने वर्ग भरवणे आणि ऑनलाइन शिक्षण पद्धती यांच्यावर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

कोरोनाच्या संकटामुळे शाळा कधी सुरू होणार याबाबक साशंकता आहे. त्यामुळे सध्याच्या काळात ऑनलाईन क्लासेस सुरू ठेवावेच लागतील, असेही सारस्वत यांनी सांगितले. मुलांमधील गुण आणि कल्पकता वाढवण्यासाठी प्रोजेक्ट बेस्ट शिक्षणावर लक्ष केंद्रीत करण्याची सूचना त्यांनी केली. त्यासाठी देशभरात एक पद्धत निश्चित करावी लागेल, त्यामुळे योग्य वयातील मुलांपर्यंत ज्ञान पोहचवण्याचे काम सुलभ होणार आहे. शाळा परत सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाने काही निर्देश जारी करून शाळांनी त्यांचे पालन करण्याकडे लक्ष द्यावे, असे म्हटले आहे. शाळा जेव्हा सुरू होतील, तेव्हा विद्यार्थ्यांच्या आरोग्य सुरक्षेकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. मुलांमध्ये सुरक्षित अंतर राहील, याची काळजी घेत वर्गवारी करून वर्गांची संख्या वाढवावी लागेल. त्यामुळे वर्ग वाढल्याने शाळा शिफ्ट पद्धतीने भरवाव्या लागतील. त्यासाठी जास्त शिक्षकांचीही गरज भासणार आहे.

शाळा सुरू झाल्या तरीही ऑनलाईन क्लास सुरू ठेवावे लागतील, ती काळाची गरज आहे. कोरोनाच्या जागतिक संकटातून जग बाहेर येत नाही, तोपर्यंत शाळा आणि ऑनलाइन शिक्षण यांचा ताळमेळ घालूनच आपल्याला विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू ठेवावे लागेल, असे सारव्त म्हणाले. ऑनलाइन शिक्षण पद्धतीचा प्रसार मोठ्या प्रमणात करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. सध्याच्या काळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ऑनलाईन तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावणार आहे, असे ते म्हणाले.

शिक्षण पद्धतीत बदल आवश्यक
प्राथमिक, माध्यमिक,उच्च माध्यमिक अशा शिक्षण पद्धतीतून आपल्याला बाहेर पडावे लागेल, या शिक्षण पद्धतीत फक्त पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमावर भर दिला जातो. आता आपल्याला ही पदग्धती बदलावी लागेल. पाठ्यपुस्तकातील शिक्षणापेक्षा आपल्याला विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला चालना देणाऱ्या शिक्षणपद्धतीवर भर द्यावा लागेल, असेही ते म्हणाले.