13 ते 15 जून दरम्यान मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता, वाचा सविस्तर बातमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

10 जूनपर्यंत म्हणजे आज मान्सून राज्यात दाखल होणार असून तळ कोकणामध्ये पावसाला आजपासून सुरुवात होईल असा अंदाज आहे. पुढच्या 3 दिवसात मोसमी पाऊस मुंबईपर्यंत धडक मारेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. 13 ते 15 जून या तीन दिवसांत मुंबईमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने हा अंदाज वर्तवला आहे.

कडकडीत ऊन आणि घामाच्या धारांतून सुटका व्हावी अशी राज्यातील सगळे नागरीक प्रार्थना करत आहेत. निसर्ग चक्रीवादळामुळे यवतमाळ वगळता अनेक जिल्ह्यात चांगला पाऊस झाला होता. पुणे, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, नगर आणि नाशिक जिल्ह्यात तर एक जूनपासून शंभर मिलिमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली होती. चक्रीवादळानंतर पाऊस पडत असला तरी हा मान्सूनपूर्व पाऊस होता. मान्सून 10 जूनपर्यंत महाराष्ट्रात दाखल होईल असे हवामान विभागाने सांगितले होते. मोसमी पाऊस 10 जूनपर्यंत महाराष्ट्रात दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. कर्नाटक, तमिळनाडू, गोव्यातील काही भागात मान्सून सक्रिय झाला असून तो लवकरच महाराष्ट्रात दाखल होणार आहे असे हवामान खात्याने मंगळवारी सांगितले होते.