
जगातील इतर देशांच्या तुलनेत हिंदुस्थानने कोरोनावर नियंत्रण मिळविले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरोग्यमंत्री हर्षवर्धन सांगतात. मात्र, राज्यातील भाजपचे नेते याबाबत वेगळे बोलत आहेत. यामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर आघाडीवर आहेत. त्यामुळे नक्की खोटं कोण बोलतंय, असा सवाल ग्रामविकास मंत्री, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे.
फडणवीस मुख्यमंत्री झाले, म्हणून ते मला सीनियर झाले. उलट पंधरा वर्षे मी मंत्री होतो. फडणवीस तर काहीच नव्हते, तरी ते डायरेक्ट मुख्यमंत्री झाले. मुळात प्रत्येकजण पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री होऊ शकत नाही, ते नशिबातच लागतं, असा टोलाही त्यांनी फडणवीस यांना लगावला.
नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीनंतर हसन मुश्रीफ बोलत होते. यावेळी आमदार संग्राम जगताप, जि. प. अध्यक्षा राजश्री घुले, उपाध्यक्ष प्रताप शेळके, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके उपस्थित होते.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी महाविकास आघाडी चांगले काम करत असताना विरोधक मात्र सातत्याने टीका करत आहेत. याचा मुश्रीफ यांनी चांगलाच समाचार घेतला. सरकारच्या बेजबाबदारपणामुळे राज्यात अनेकांचे बळी गेले आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते दरेकर यांनी केला होता. त्यांच्या या आरोपाला उत्तर देताना मुश्रीफ म्हणाले, आम्ही केंद्र सरकारच्या अंतर्गत येणाऱया आयसीएमआरच्या निर्देशानुसार काम करतो. त्यामुळे दरेकर यांनी रुग्णांच्या तपासणीबाबत आम्हाला विचारण्याऐवजी आयसीएमआरला विचारावे. मुळात सरकार अडचणीत यावे, यासाठी देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर ही मंडळी देव पाण्यात घालून बसले आहेत. खरंतर कोरोना रुग्णांचा आकडा कमी झाला आहे. त्यामुळे मृत्यू कमी झाले आहेत. याचेच फडणवीस व दरेकर यांना वाईट वाटत आहे, असेही ते म्हणाले .
मौनामुळे मनाला शांती लाभते
मी फडणवीस यांना माझ्याकडे असलेले ‘मौनम् सर्वार्थ साधनम्’ हे पुस्तक दिलं होतं; ते त्यांनी वाचले नसावे. मौन पाळले तर मनाला शांती लाभते. प्रतिकूल काळात अध्यात्म हाच उपाय आहे, हे फडणवीस यांनी लक्षात घ्यावे, असा सल्लाही ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
पीककर्जासाठी शेतकऱयांना अडचण येणार नाही
शेतकऱयांना कर्जपुरवठा करण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकांनी जी आडकाठी घातली होती, त्यासंदर्भात राज्य सरकारने रिझर्व्ह बँकेला बॉण्ड दिला आहे. आता कोणत्याही शेतकऱयाला पीककर्ज घेण्यास अडचण येणार नाही. कर्जवितरण तत्काळ करावे, असे आदेश दिल्याची माहिती ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. तर, ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे, तेथे प्रशासक नेमण्यासंदर्भात निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.




























































