
मान्सूनने कोकणात जोरदार सलामी दिली आहे. कोरोना आणि चक्रीवादळाच्या संकटात सापडलेल्या रत्नागिरीकरांच्या दुःखांवर फुंकर घालत पावसानं कोकण ओलचिंब केले आहे. ढगांचा गडगडाट आणि वीजांचा चमचमाट करत कोकणात पाऊस धो-धो कोसळत आहे.निसर्ग चक्रीवादळात झालेल्या नुकसानीवर अवकाळी पावसाने अश्रु ढाळले होते. वादळानंतर पाऊस लांबणीवर जाईल अशी चिंता बळीराजाला सतावत असताना मॉन्सून कोकणात दाखल झाला. एरव्ही आगमनाची सर घेऊन येणाऱ्या मॉन्सूनने सलामीलाच झोडपायला सुरूवात केली आहे पुढे आणखी दोन दिवस पावसाचा ज़ोर वाढणार आहे.
मॉन्सूनने जोरदार सलामी दिल्यामुळे अनेकांची पहिल्याच पावसाने त्रेधातिरपीट उडवली. गुरूवारी रात्रीपासून धो-धो कोसळणाऱ्या पावसामुळे लॉकडाऊन नंतर सुरू झालेले जनजीवन विस्कळीत झाले अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुकीला अडथळा झाला होता. सायंकाळी साडे सहा वाजता पुन्हा पावसाने झोडपायला सुरूवात केली.
लॉकडाऊनच्या काळात सर्वकाही ठप्प असल्याने कोकणी माणसाला आशेचा किरण शेतीमध्ये दिसतोय. धो-धो पाऊस कोसळत असल्याने नांगरणीच्या कामाला प्रारंभ झाला आहे. चाकरमानी गावी आल्याने शेतीच्या कामांना माणसांची कमतरता नाही.




























































