कडेगावच्या नदीला पहिल्याच पावसाने पूर, शेतकऱ्यांमध्ये समाधान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील कडेगाव येथील नदीला पहिल्याच पावसाने जोरदार पूर आला असून मागील पाच वर्षांपासून मृतावस्थेत असलेल्या लहुकी नदीला आलेल्या पूरामुळे या परिसरातील पाणी टंचाई दूर होऊन सिंचनाची सोय होणार असल्याने शेतकऱ्यांत आनंद व्यक्त होत आहे.

बदनापूर तालुक्यातील उरली, कडेगाव, कुसळी, देवगाव कस्तुरवाडी, रोषणगाव, सायगाव, मांजरगाव या प्रमुख गाव परिसरातून ही लहुकी नदी वाहते. या नदीमुळे वरील गावासह तालुज्यातील नदी काठच्या 18 ते 20 गावाचा सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघतो. मात्र निसर्गाच्या अवकृपेने पावसाचे प्रमाण कमी होत गेल्याने मागील पाच वर्षांपासून या नदीला पाणीच आले नव्हते. पाच वर्षांपासून मृतावस्थेत ही नदी होती त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांवर याचा विपरीत परिणाम होऊन उत्पादनात घट झालेली होती. या नदी काठी असलेल्या अनेक मोसंबी, डाळींब व द्राक्षाच्या फळबागा शेतकऱ्यांना पाण्याअभावी तोडून टाकाव्या लागल्या होत्या. तसेच अनेक गावात पाण्याची टंचाई निर्माण झालेली होती. पण यंदा निर्सगाने कमाल दाखवली असून मान्सूनच्या पहिल्याच पावसात ही नदी खळाळून वाहिली.

पाच ते सहा वर्षांपासून पाणी न आलेल्या नदीला पहिल्याच पावसात पूर आल्याने शेतकरी ही सुखावला. या बाबत येथील शेतकरी व माजी उपसरपंच गणेश कोल्हे यांनी सांगितले की, कडेगाव परिसरात मागील पाच वर्षात नदीला पाणी न आल्याने शेतकरी हवालदिल होते पण या वर्षी झालेल्या पावसाने शेतकऱ्याच्या आशा पल्लवित झाल्या असून नदीत मागील दोन – तीन वर्षांपासून खोलीकरण व बंधारे बांधल्यामुळे पाणी साठवन मोठ्या प्रमाणात होणार आहे. बुधवारी झालेल्या थोड्याश्या पावसानंतर या परिसरातील शेतकऱ्यांनी कापूस, मका व तूर लागवडीची लगबग सुरू केली होती शुक्रवारपर्यंत जवळपास 70 टक्के शेतकऱ्यांनी कापूस लागवड केलेली आहे. तर बाजरी व सोयाबीनच्या पेऱ्यालाही वेग येतानाचे चित्र आहे. निसर्गाने कमाल दाखवत पाच वर्षानंतर नदीला पूर येऊन आपले काम बजावले असताना आता प्रशासनाने ही सद्य खडतर परिस्थितीत बांधावर शेतकऱ्यांना खत व बी-औषधी पुरवावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.