
>> प्रशांत गौतम
अंबाजोगाई येथील प्रख्यात रंगकर्मी, दिग्दर्शक आणि रामानंद तीर्थ महाविद्यालयाचे पहिले सेवानिवृत्त नाटय़शास्त्र विभागप्रमुख प्रा. केशव देशपांडे यांच्या निधनाने येथील नाटय़चळवळ पोरकी झाली आहे. देशपांडे शेतकरी संघटनेचेही कट्टर पुरस्कर्ते होते. नाटय़चळवळ आणि शेतकरी संघटना हे त्यांचे कार्यक्षेत्र त्यांनी आपल्या कार्यकौशल्याने अधोरेखित करून ठेवले आहे. केशवकाका धाराशीव जिल्हय़ातील कळंब तालुक्यातील इटकूर, रायगव्हाणचे. त्या ग्रामीण भागातून लातुरात शिकायला आले. तिथे त्यांची नाना गोवांडे यांच्याशी मैत्री झाली. नाटय़प्रेम हा दोघांत एकसमान गुणविशेष असल्याने मैत्री दृढ होत गेली. दोघेही विजया मेहतांच्या नाटय़ प्रशिक्षण वर्गात सामील झाले होत़े त्यामुळे दोघांच्या नाटय़ प्रवासाच्या वाटचालीस शिस्तबद्ध सुरुवात झाली. दोघांच्याही वयात अंतर असले तरी त्यांना नाटय़प्रेमाच्या धाग्याने एकत्र बांधून ठेवले होते. नाटक हे तर देशपांडे यांच्या व्यक्तिमत्त्वात, नसानसात भिनले होते. ते साधे बोलतानाही याचा प्रत्यय भेटणाऱयास येत असे. याच नाटय़प्रेमाच्या अविरत ओढीमुळे ते पुढील काळात दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा या प्रख्यात संस्थेशी जोडले गेले. 1975-76 या काळात एनएसडीत दाखल झालेले मराठवाडय़ातील ते पहिले विद्यार्थी होते. राष्ट्रीय स्तरावरील नाटय़क्षेत्रात एनएसडीचा काय दबदबा असतो हे नाटय़शास्त्रातील जाणकारांना वेगळे सांगण्याची गरज नसावी. तिथे असताना कविता चौधरी, अन्नू कपूर यांच्यासारखे दिग्गज सहअध्यायी लाभले. या नामांकित संस्थेस नसरुद्दीन शाह, रोहिणी हट्टंगडी, कुलभूषण खरबंदा यांच्यासारखे नाटय़प्रेमी लाभले. एनएसडीतून बाहेर पडल्यावर त्यांनी काही काळ पुण्यात फिल्म ऍण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूटमध्ये डायरेक्टर म्हणून काम केले. पुढे मुंबईत इंडियन नॅशनल थिएटर या ठिकाणी गेले. खरे तर पुढचा हा प्रवास व्यवस्थित सुरू राहिला असता तर देशपांडे यांच्या प्रवासाचे चित्र कदाचित वेगळे दिसले असते, पण आपल्या एकुलत्या एक मुलाने गावी येऊन घर, शेतीची जबाबदारी सांभाळावी असे वडिलांना वाटायचे. ‘गावाकडे परत ये नाही तर मी जिवंत समाधी घेतो’ असे वडिलांनी केशवरावांना पत्रात लिहून कळवल्यामुळे फिल्मी करिअरचे मोठे कार्यक्षेत्र सोडून ‘गडय़ा अपुला गाव बरा’ हा मार्ग स्वीकारावा लागला. एनएसडीसारख्या प्रख्यात संस्थेत शिक्षण घेऊन आलेला देशपांडे यांच्यासारखा गुणी व अव्वल दर्जाचा कलावंत मोठी वाटचाल सोडून गावाकडे परतला व शेती पाहू लागला. त्यानंतरच्या काळापासून देशपांडे शेतकरी संघटनेच्या संपर्कात आले. शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्याशी त्यांचा स्नेह वाढला. धाराशीव जिल्हय़ाचे शेतकरी संघटनेचे पहिले संपर्कप्रमुख म्हणून त्यांचे कार्य सुरू झाले. शेतकरी संघटनेचे दौरे, सभा, बैठका, जाहीर सभा, भाषणबाजी असे कार्यक्षेत्र सुरू झाले. अंगात नाटय़गुण भिनलेले असल्याने त्यांनी शेतकऱयांसमोर केलेले भाषणही खूप प्रभावी व्हायचे. शेतकरी संघटनेचे प्रशिक्षक म्हणून काही दिवस अंबेठाण येथे ते राहिले. या अतूट स्नेहामुळे देशपांडे शरद जोशी यांचे आवडते शिष्य झाले. पण एवढय़ावर घराची, शेतीची जबाबदारी पार पाडणे पुरेसे नव्हते. अंबाजोगाईत 1973 साली योगेश्वरी नाटय़ मंडळाची स्थापना झाली होती. पुढच्या वर्षी ते योगेश्वरी महाविद्यालयात प्रयोगशाळा सहायक म्हणून रुजू झाले. नाटक आणि महाविद्यालय असा दोन्ही प्रवास सुरू झाला. योगेश्वरी नाटय़ मंडळाच्या वतीने अनेक नाटकांचे दिग्दर्शन केले. बेइमान, सूर राहू दे, ससा आणि कासव, नाती-गोती अशा अनेक नाटकांची नावे सांगता येतील. सदानंद रेगे यांच्या मी जयकेतू या नाटकाचे दिग्दर्शन करून त्यात त्यांनी भूमिकाही केली. अंबाजोगाईत योगेश्वरी नाटय़ मंडळ स्थापन झाल्याने त्यांच्या पुढाकाराने अनेक नाटके राज्य नाटय़ स्पर्धेत गेली. ज्येष्ठ संगीतकार, कवी राम मुकदम यांच्या पुढाकाराने अंबाजोगाईत मेळे बसविले जात. लोहिया दाम्पत्याच्या पुढाकाराने समाज जनजागृतीवर नाटके होत असत. तीच परंपरा केशवरावांनी पुढे कायम ठेवली. 1990 च्या सुमारास स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयात नाटय़शास्त्र विभाग झाला आणि त्याचे पहिले विभागप्रमुख होण्याचा सन्मान केशवरावांना लाभला. आपल्या कार्यकाळात त्यांनी अनेक विद्यार्थी घडविले. याच कार्यकाळात त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘सूर राहू दे’ या नाटकात भूमिका करण्याची संधी डॉ. दिलीप घारे, प्रा. प्रकाश प्रयाग, प्रा. सुधीर वैद्य, विजय कदम यांना मिळाली. तसेच देशपांडे यांच्यासोबत काम करण्याची संधीही मिळाली. देशपांडे यांचे निधन नाटय़प्रेमी, त्यांचे विद्यार्थी यांच्यासाठी क्लेशदायकच आहे. त्यांच्या कार्याची स्मृती पुढे कायम असावी, यासाठी त्यांचे नाव नाटय़शास्त्र विभागाच्या एका दालनास द्यावे, अशी सूचना डॉ. यशवंत देशमुख यांनी केली ती योग्यच आहे.
























































