
‘अनलॉक 1.0’ सुरू करताना अनेक खासगी आणि सरकारी कार्यालयांना सुरू करण्याची परवानगी मिळाली असताना राज्य सरकारच्या मागणीवरून सोमवार 15 जूनपासून उपनगरीय लोकल ट्रेन सुरू करण्यात आली आहे. परंतू सुरूवातीला केवळ मुंबई महानगर पालिका, बेस्ट, मंत्रालय, पोलीस तसेच खासगी आणि सरकारी रूग्णालयातील आरोग्य कर्मचारी यांना लोकलमधून प्रवासाची मंजूरी मिळाली होती. आता रेल्वे मंत्रालयाने एसटी महामंडळासह मुंबई महानगर प्रदेशातील सर्व महापालिका कर्मचार्यांना अत्यावश्यक सेवेअंतर्गत लोकलमधून प्रवास करण्याची मुभा दिली आहे.
सोमवारपासून उपनगरीय लोकल सेवांना मर्यादित प्रमाणात सुरूवात करण्यात आली होती. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर दररोज एकूण 346 उपनगरीय लोकल सेवा चालविण्यात येत आहेत. या सर्व लोकल सेवा या केवळ अत्यावश्यक कर्मचार्यांसाठीच असल्याचे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले असून त्या राज्य सरकारच्या मागणीनूसारच चालविण्यात येत असल्याचे रेल्वेने म्हटले आहे. या सेवांमध्ये अनेक खाजगी कर्मचार्यांसह केंद्र सरकारच्या बँक आणि पोस्ट खात्यांच्या कर्मचार्यांना प्रवेश दिलेला नाही.
एसटी महामंडळाचे कर्मचारी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड येथे सुरूवातीपासून बेस्टच्या खांद्याला खांदा लावून सेवा चालवित आहेत. तसेच ते मुंबईच्या बाहेर विरार, पनवेल आणि बदलापूर येथून कामावर येत असल्याने त्यांना मुंबईत येण्यासाठी लोकलमध्ये प्रवेश देण्यात यावा अशी मागणी एसटी कामगार सेनेने राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता आणि परिवहनमंत्री अॅड. अनिल परब यांनी पत्र लिहून केली होती.
या कर्मचार्यांचा अत्यावश्यक सेवेत समावेश
रेल्वे मंत्रालयाने एसटी महामंडळाच्या कामगारांचा समावेश अत्यावश्यक कामगारांमध्ये असल्याचे मान्य करीत त्यांना लोकल प्रवासाची अनुमती देण्याचा हा निर्णय घेतला आहे. त्यासोबतच ‘एमएमआर रिजन’मधील सर्व महापालिकांचे कर्मचारी (मीरा-भाईंदर, विरार-वसई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवीमुंबई आणि पालघर) तसेच खाजगी आरोग्य कर्मचार्यांसह पॅथॉलजी आणि लॅबचे कर्मचारी आणि मंत्रालयाचे कलेक्टर ऑफिसेससह सर्व कर्मचारी आणि रेल्वेचे स्वत: चे एमआरव्हीसी, आयआरसीटीसी आणि रेल्वेच्या ‘वर्कमन्स स्पेशल’मध्ये प्रवासाची अनुमती असलेल्या सर्व कर्मचार्यांना आता लोकलमधून प्रवास करण्यास परवानगी दिली आहे.
पश्चिम आणि मध्य रेल्वेत असमन्वय
यासंदर्भातील निर्णय पश्चिम रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक यांच्या लेटरहेडवर प्रसिद्ध करण्यात आला आहे. यासंदर्भात मध्य रेल्वेने मात्र आमच्यापर्यंत हा निर्णय आला नसल्याचे म्हटले आहे. परंतू एसटी महामंडळाचे बहुतांश सर्व कर्मचारी बदलापूर, कर्जत ते पनवेल परिसरात रहायला असल्याने पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे अशा दोन्ही झोनमध्येच परस्पर समन्वय असल्याचे उघड झाले आहे.
























































