
>> प्रशांत गौतम
के. ओ. तथा कचरू ओंकार गिऱ्हे हे भटक्या विमुक्त चळवळीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक होते. त्यांच्या निधनामुळे साहित्य आणि चळवळीचे नुकसान झाले आहे. भटक्यांसाठी झिजणारे, वंचित उपेक्षितांना न्याय मिळावा, यासाठी झुंज देणारे ते हाडाचे कार्यकर्ते होते. आंबेडकरवादी विचारांची पेरणी करणारे ते राष्ट्रीय लेखक होते. भटक्या-विमुक्तांच्या वेदना गिऱ्हे यांनी आपल्या ‘भटक्या’ या आत्मकथनातून अत्यंत प्रभावीपणे मांडल्या होत्या, त्यामुळेच त्यांचे आत्मकथन बरेच गाजले आणि चर्चेतही आले. त्याचप्रमाणे गोपाळ समाज इतिहास आणि संस्कृति, दोरीवरचं काळीज, भटक्याची स्वातंत्र्याची पहाट कधी उगवेल, मजल-दरमजल, वेदना पर्व अशी गिऱ्हे यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. गिऱ्हे यांचे व्यक्तिमत्त्व मितभाषी होते. याच गुणविशेषांमुळे त्यांनी भटक्यांचे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी संघटना उभारली. आपल्या ऋजू स्वभावामुळे त्यांनी आधी माणसा-माणसांना जोडण्याचे, एकत्र आणण्याचे काम केले. त्यातूनच भटक्यांचे भावविश्व उभारले ते वंचित उपेक्षित समाजाच्या नेहमी पाठीशी असत. अगदी त्यांना न्याय मिळावा, एवढीच त्यांची निःस्वार्थी भावना असायची. गिऱ्हे यांच्या लेखनकार्य आणि चळवळीत झोकून देण्याच्या स्वभावाला आयुष्यात जोडीदाराची साथ मिळाली ती पत्नी जनाबाई गिऱ्हे यांची. एका विशिष्ट ध्येयाने वाटचाल करणारे हे गिऱ्हे दाम्पत्य होय. पत्नी जनाबाई गिऱ्हे यांचे ‘मरणकळा’ हे आत्मकथन बरेच गाजले. पती-पत्नीच्या समांतर प्रवासावर आधारित जे मजल-दरमजल हे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे, तो गौरवग्रंथ आहे. विशेष म्हणजे गिऱ्हे पती-पत्नीची अनेक पुस्तके विविध विद्यापीठांत अभ्यासक्रमात क्रमिक पुस्तक म्हणून सहभागी आहेत. चळवळ मग ती कोणतीही असो, ती भटक्याची असेल तर तिचे विशेष परिश्रम घेऊन चळवळीची संवर्धन-संगोपन करावे लागते, अगदी पदरमोड करून चळवळ जिवंत ठेवण्याचे कार्य के. ओ. गिऱ्हे यांनी केले. पदरमोड करून त्यांनी त्यांनी ‘भटक्याचे भावविश्व’ हे मासिक सुरू केले. नियमितपणे अंक, दिवाळी अंकही जोमात प्रसिद्ध केले. या माध्यमातून त्यांनी लेखक आणि कार्यकर्त्यांना व्यक्त होण्याचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. या मासिकाचे संपादक म्हणून ते अखेरपर्यंत कार्यरत राहिले. सामाजिक चळवळीत, तळागाळातल्या शेवटच्या घटकापर्यंत काम करायचे तर स्वभाव हा तुसडा असून चालत नसतो. अंगात चार माणसं जमवण्याचा व ती जतन करण्याचा एक गुण असावा लागतो. चळवळ अशा धडपडीतून पुढे जात असते. गिऱ्हे यांनी ते नेमकेपणाने जाणले. आज तर अनेक ठिकाणी विविध साहित्य संमेलने होत असतात. अशा संमेलनाच्या माध्यमातून लेखक आणि कार्यकर्ते एकत्र येतात. विचारांचे आदानप्रदान करतात. मग भटक्यांचे राज्यस्तरीय संमेलन का असू नये असा त्यांनी विचार केला व प्रत्यक्ष कृतीतही आणला. भटक्या-विमुक्तांच्या राज्यस्तरीय संमेलनाचे अध्यक्ष होण्याचा त्यांना सन्मान 2008 साली लाभला. या माध्यमातून दरवर्षी भटके-विमुक्तांचे साहित्य संमेलन विविध ठिकाणी आयोजित होत असते. यंदाचे संमेलन संभाजीनगरातील मौलाना आझाद संशोधन केंद्रात फेब्रुवारी महिन्यात उत्साहात पार पडले होते. गिऱ्हे यांनी आपल्या भटक्याचं आत्मकथन, दोरीवरचं काळीज (कथासंग्रह) या साहित्यकृतीतून भटक्यांचे भावविश्व तिडकीने मांडले. आपल्या वाटचालीच्या प्रवासात आलेले सच्चे अनुभव वाचकांसमोर प्रभावीपणे मांडले. त्यांच्या लेखनाला सामाजिक अधिष्ठानाची जोड असल्याने त्यांनी निर्माण केलेली साहित्यकृती वाचकांच्या हृदयाचा ठाव घेणारी ठरली. संमेलनाच्या अध्यक्षपदाचा बारा वर्षांपूर्वी जेव्हा त्यांना सन्मान मिळाला तेव्हा त्यांनी संमेलनाच्या व्यासपीठावरून केलेल्या अध्यक्षीय भाषणातून नव्या पिढीला आंबेडकरवादाची प्रेरणा दिली, जी आज त्यांच्या पश्चात कार्य करणाऱयांसाठी महत्त्वाची ठरणारी आहे. भटक्यांच्या प्रश्नांना वेशीवर टांगण्याचे काम त्यांनी आपल्या मासिकाच्या माध्यमातून तर सातत्याने केले. एवढेच कशाला, कोरोना काळात भटक्या-विमुक्तांच्या पालावर जाऊन जीवनावश्यक साहित्याची मदत देण्याचेही काम त्यांनी निष्ठsने केले. म्हणूनच गिऱ्हे यांच्या अचानक जाण्याने कार्यकर्त्यांनाही मोठा धक्का बसला आहे. कृषी विभागातून सेवानिवृत्त झाल्यावर त्यांनी स्वतःला लेखन आणि चळवळीच्या कार्यास झोकून दिले होते. भटक्यासाठी भटकंती करणारे गिऱ्हे गेले. भटक्याची भ्रमंती आता थांबली आहे. भटक्याचे भावविश्व पोरके झाले आहे.




























































