व्हॉट्सऍपवर सोशल प्रतिबिंब! अमेरिकेचा वंशभेद ते सुशांत सिंगच्या आत्महत्येचे पडसाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगभरातील सामाजिक घटनांचे प्रतिबिंब कला, साहित्य, नाटय़ आणि सिनेमावर उमटतेच तसे आता सोशल साईटवर देखील उमटत आहे. मोबाईलचे स्टेटस बदलणारी नवीन पिढी पाहून लोकप्रिय मॅसेजिंग ऍप व्हॉट्सऍपनेही सामाजिक भान राखत अमेरीकेच्या वंशभेदापासून ते बॉलीवूडच्या सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येलाही आपल्या इमोजीच्या शेजारच्या ‘गीफ’ फाईल्समध्ये स्थान दिले आहे.

फेसबुक पाठोपाठ सगळ्यांच्या मोबाईलमध्ये असणाऱया व्हॉट्सऍप या ऍप्लीकेशनने तर त्यात आघाडी घेतली आहे. अमेरिकेतील काळा-गोरा वंशभेद असो की आपल्या बॉलीवूडमधील कोवळा अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने केलेली आत्महत्या असो. या प्रत्येक घटनेला ‘व्हॉट्सअप ऍप’वर ‘गीफ’ फाईल्सच्या स्वरूपात स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे नेट युजर्सना त्यांच्या भावनांना मोकळी वाट करून देता येत आहे.

अमेरिकेत गोऱया पोलीसाकडून कृष्णवर्णीयाचा बळी गेल्याने तेथे पोलीसांच्या दडपशाही विरोधात समाजातील सर्वांनी आवाज उठला. अमेरिकेत ‘ब्लॅक लिव्हज् मॅटर’ असे फलक घेऊन तरूण-तरूणी रस्त्यांवर उतरले. या सर्व समाजातील तरूणांच्या ओठांवर असलेल्या भावनांनाच लोकप्रिय ‘सोशल साईट’ व्हॉट्सऍप ऍपने अक्षरश कॅच केले आहे.

मीम्सपासून ते बूमरँगपर्यंत…
व्हॉट्सऍप ऍप हे केवळ इमोजीपुरते न राहता, त्याने मानवाच्या खऱया भावनांना वाट मोकळी करून देण्यासाठी आपल्या भात्यात इमोजीच्या फाईलच्या शेजारी स्टेट्स ठेवता येतील अनोख्या ‘गीफ’ फाईल ठेवल्या आहेत. त्यात सध्याच्या करंट टॉपिकवरील गीफ फाईल उपलब्ध होत असतात. त्यात अमेरीकेतील वंशवादावरील ‘ब्लॅक लिव्हज् मॅटर’ पासून ते बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतवरील भावनाप्रधान मीम्स व बुमरँग ठेवले आहेत.