
लोकसभेत सर्वाधिक चर्चांमध्ये सहभागी होण्यात महाराष्ट्रातील खासदारांनी बाजी मारली आहे. शिवसेनेचे राहुल शेवाळे, डॉ. श्रीकांत शिंदे, श्रीरंग बारणे, विनायक राऊत यांचा देशातील टॉप फाईव्ह खासदारांमध्ये समावेश झाला आहे.
लोकसभेत यावेळी महाराष्ट्रातील खासदारांनी विशेष कामगिरी केली आहे. महाराष्ट्रातील प्रश्नांसाठी सदैव तत्पर राहत तसेच देशहिताच्या प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधण्यात अधिकाधिक चर्चांमध्ये सहभागी होण्याचा बहुमान शिवसेना खासदारांना मिळाला आहे. विशेष म्हणजे पहिल्या पाच खासदारांमध्ये चार खासदार शिवसेनेचे आहेत. त्यामध्ये राहुल शेवाळे (मुंबई दक्षिण मध्य), डॉ. श्रीकांत शिंदे (कल्याण), श्रीरंग बारणे (मावळ), विनायक राऊत (रत्नागिरी–सिंधुदुर्ग) यांचा समावेश झाला आहे.
17 व्या लोकसभेतील 543 मतदारसंघातील खासदारांचे रिपोर्ट कार्ड प्रसिद्ध झाले आहे. यासाठी सजग मतदार ही प्रगल्भ लोकशाहीसाठी पूर्वअट आहे. केवळ निवडणुकीच्या वेळेस नव्हे तर, दोन निवडणुकीच्या दरम्यानच्या काळातही आपल्या प्रतिनिधीने केलेल्या कामांचा आढावा या रिपोर्टमध्ये दिला जातो. प्रत्येक खासदाराने निवडून आल्यापासून काय काय काम केले, त्यांची उपस्थिती किती होती, त्यांनी किती चर्चांमध्ये सहभाग घेतला इत्यादी निकषांच्या आधारे टॉप 5 खासदारांचे रिपोर्ट काढला जातो.



























































