
भविष्य निर्वाह निधी (EPFO) वरील व्याजदरात पुन्हा कपात होण्याचे संकेत मिळत असून याचा थेट परिणाम लाखो खातेधारकांवर होणार आहे. काही महिन्यांपूर्वी EPFO वरील व्याजदर कमी करण्यात आले होते. गुंतवणुकीवरील परतावा सातत्याने घटत असल्याने EPFO वरील व्याजात कपात करण्याचा विचार सुरू आहे.
याआधी EPFO वर 8.65 टक्के व्याज मिळत होते, मात्र मार्च महिन्यात यात 0.15 टक्के कपात करण्यात आली. त्यामुळे नवीन व्याजदर 8.50 टक्के एवढा झाला. मात्र आता यात आणखी कपात करून व्याजदर 8.10 टक्क्यांपर्यंत आणण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
‘इकॉनॉमिक्स टाइम्स’ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, EPFO वरील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेण्यासाठी EPFO चा अर्थ विभाग, गुंतवणूक विभाग आणि ऑडिट विभाग यांच्यात महत्वपूर्ण बैठक होणार आहे. यात EPFO वर मिळणाऱ्या व्याजदरात किती कपात करायची याचा निर्णय होईल. मार्च महिन्यात EPFO वरील व्याजदर 8.50 टक्के करण्यात आले होते, मात्र अर्थ मंत्रालयाने अद्यापही त्याला मंजुरी दिलेली नाही.


























































