लॉकडाऊनचा ‘इस्रो’लाही फटका; गगन यान, चांद्रयान-3 सह दहा महत्त्वाकांक्षी प्रकल्प रखडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना महामारीमुळे देशभरात लावण्यात आलेल्या लॉकडाउनचा फटका हिंदुस्थानी अंतरिक्ष संशोधन संस्थेच्या (इस्रो ) गगनयान, चांद्रयान-3 या महत्त्वाकांक्षी मोहिमांसह 10 प्रकल्पांना बसला आहे. हे प्रकल्प रखडल्याने आता त्यांच्या अंमलबजावणीला विलंब होण्याची शक्यता इस्रोप्रमुख के. सिवन यांनी व्यक्त केली आहे. या मोहिमांचे प्रक्षेपण अथवा अंमलबजावणी याच वर्षी करण्याची योजना होती. मात्र लॉकडाऊनमुळे आमच्या सर्वच मोहीम रखडण्याची भीती आहे असेही सिवन यांनी स्पष्ट केले.

इस्रोने यंदा प्रक्षेपणाच्या 10 योजना आखल्या होत्या. पण कोरोना महामारीमुळे बहुतेक सर्व उद्योग बंद राहिल्याने अंतराळ मोहिमांसाठीची उपकरणे बनविण्यासाठीच्या पार्ट्सची निर्मिती ठप्प झाली आहे. त्यामुळे मोहिमांसाठीची उपकरणे प्रक्षेपणासाठी सज्ज करणे कठीण झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून सारे काम ठप्प झाल्याने 2022 ला प्रक्षेपित करायचे ‘गगनयान’ हे अंतराळातील पहिले स्वदेशी मानवमिशन वेळेत यशस्वी करण्यावर प्रश्नचिन्ह उभे टाकल्याची माहिती के. सिवन यांनी दिली.

गगनयानसह अनेक मोहिमा खासगी उद्योगांवर अवलंबून
2022 मध्ये इस्रोची चंद्रावर हिंदुस्थानी अंतराळवीर पाठविण्याची ‘गगन यान’ मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेसह अनेक मोहिमांसाठीची उपकरणे खासगी उद्योग तयार करतात. पण लॉकडाऊनमुळे ते सर्व उद्योग अजून सुरु न झाल्याने इस्रो चिंतेत आहे. ही उपकरणे बनविणारे सुष्म, लघु आणि माध्यम उद्योग सुरु होण्याची प्रतीक्षा आम्ही करीत आहोत. चांद्रयान-3 सह आमचे अनेक प्रकल्प याच उद्योगांच्या उपकरणे पुरवठय़ावर अवलंबून आहेत, असे सिवन म्हणाले. आपले चार संभाव्य अंतराळवीर रशियात अंतराळ मोहिमेचे प्रशिक्षण घेत आहेत. त्यातील तीन अंतराळवीर गगनयान मोहिमेत सहभागी होत हिंदुस्थानी तिरंगा अवकाशात फडकावणार आहेत. लॉकडाऊनचा फटका या मोहिमेलाही बसण्याची शक्यता सिवन यांनी बोलून दाखवली.