
कोरोना रुग्णांवर प्रभावीपणे उपचार व्हावा म्हणून सुमारे दीडलाख आयुष डॉक्टरांपैकी एक लाख आयुष डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यात आलं. मात्र यातील केवळ दीड हजार डॉक्टरांनीच कोरोना रुग्णांसाठी सेवा द्यायला सुरुवात केली आहे. 98 हजार डॉक्टर या सेवेसाठी हजरच झाले नाहीत. प्रशिक्षणासाठी लाखो रुपये खर्चूनही डॉक्टर हजर होत नसल्याने त्यांचं करायचं काय असा प्रश्न सरकारला पडला आहे.
कोरोनाच्या लढाईत सहभागी होण्यासाठी डॉक्टरांना एप्रिल महिन्यात ऑनलाइन प्रशिक्षणही देण्यात आलं. गरज पडल्यास या डॉक्टरांनी कोरोना रुग्णांच्या सेवेत हजर रहावे या उद्देशानेच त्यांना प्रशिक्षण देण्यात आलं. यापैकी दीड हजार डॉक्टरांना राज्यातील वेगवेगळ्या भागात पोस्टिंग देण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य शिक्षण सचिव संजय मुखर्जी यांनी दिली. आयुष डॉक्टरांना प्रशिक्षण देणं हे आमचं काम होतं. ते आम्ही केलं.
एप्रिल महिन्यात एक लाख डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे. त्यांची नियुक्ती करण्याचं काम डायरेक्ट्रेट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्चचं आहे, असं महाराष्ट्र आयुषचे संचालक डॉ. कुलदीप कोहली यांनी सांगितलं. मुंबईपासून राज्यभरात डॉक्टरांची कमतरता असल्याचं प्रत्येकाला माहीत आहे. सरकारने तात्काळ या डॉक्टरांना नोटीस पाठवायला हवी, अशी मागणी अॅलोपथीच्या डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.


























































