हिंदुस्थानकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्यांना धडा शिकवला -पंतप्रधान नरेंद्र मोदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mann-ki-baat-modi-pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मन की बात या कार्यक्रमात चीनबाबत आपले विचार जनतेपुढे मांडले. हिंदुस्थानच्या लडाखकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्या चीनला हिंदुस्थानच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर देत चांगला धडा शिकवला आहे, असे मोदी म्हणाले. देशाकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्यांचे डोळे काढण्याची ताकद हिंदुस्थानमध्ये आहे, हे या जवानांनी जगाला दाखवून दिले आहे. देशासाठी शौर्य गाजवत बलिदान देणाऱ्या जवानांचा आणि त्यांच्या कटुंबीयांचा देशाला अभिमान असल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले. कोरोनाच्या संकटाने जगाला वेढले असतानाच शेजारी देशांच्या कुरापतींना जवानांनी चोख प्रत्युत्तर दिल्याचे ते म्हणाले.

पंतप्रधान मोदी यांनी माजी पंतप्रधान नरसिंह राव यांनी श्रद्धांजली अर्पण केली. आजपासून नरसिंह राव यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत असल्याचे ते म्हणाले. देश बिकट परिस्थितीतून जात असताना नरसिंह राव यांनी देशाचे नेतृत्व केले. ते असामान्य नेते होते, असेही ते म्हणाले. कोरोनाच्या संकटाबाबत याआधीही आपण चर्चा केली आहे. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे आणि काळजी घेणे, हाच कोरोना रोखण्याचा उपाय आहे. देशाने याआधीही अनेक संकटांचा मुकाबला केला आहे. अशी 50 संकटे आली तरी आपण त्याचा मुकाबला करायला देश समर्थ आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या एका संकटामुळे हे वर्ष अभुभ आहे, असे मानणे अयोग्य आहे. कोरोनाचे संकट असतानाच अम्फान, निसर्ग यासारखी चक्रीवादळे आली. देशाच्या काही भागांना भूकंपाचे धक्के बसत आहेत. त्यातच पाकिस्तान, नेपाळ, चीनसराखे शेजारी देश कुरापती काढत आहेत. या सर्व संकटांना आपण तोंड देत आहोत. एका वर्षात एक आव्हान असो किंवा 50 संकटे असोत, आपण डगमगून न जाता धैर्याने त्याचा मुकाबला करतो, हेच आपले वैशिष्ट्य असल्याचे मोदी यांनी सांगितले. या सर्व संकटांवर मात करून आपल्याला नवी स्वप्न बघायची आहेत, असे ते म्हणाले. आपली संस्कृती आणि मूल्यांनी आपल्याला या संकटांशी मुकाबला करण्याचे बळ मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आता वातावरण बदलत आहे. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घ्यावी. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.