ठसा – राजिंदर गोयल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>  जयेंद्र लोंढे

मै जिंदगी का साथ निभाता चला गया… जो मिल गया उसी को मुकद्दर समझ लिया… हे ‘हम दोनो’ या चित्रपटातील गाण्याचे बोल प्रसिद्ध पद्माकर शिवलकर यांनी मुंबईकर क्रिकेटपटूंनी राजिंदर गोयल यांच्या निधनानंतर बोलून दाखवले. या वेळी ते म्हणाले, हे बोल आमच्या दोघांसाठी बनलेले आहेत असे वाटते. हिंदुस्थानातील स्थानिक क्रिकेटमध्ये दोघांनी मिळून 1300 च्या वर फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. मात्र क्रिकेटच्या रणभूमीत मोठा पराक्रम केल्यानंतरही दोघांनाही एकाही लढतीत हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करता आले नाही ही शोकांतिकाच. 20 सप्टेंबर 1942 रोजी राजिंदर गोयल यांचा जन्म नरवाना, पंजाब येथे झाला. आता तो भाग हिंदुस्थानातील हरयाणामध्ये आहे. राजिंदर गोयल यांचे वडील हिंदुस्थानी रेल्वेमध्ये सहाय्यक स्टेशन मास्टर म्हणून नोकरी करीत होते. राजिंदर गोयल यांनी शिक्षण रोहतकमधील वैश शाळा व कॉलेजमधून पूर्ण केले. अखिल हिंदुस्थानी शालेय क्रिकेट स्पर्धेत उत्तर विभागाकडून खेळताना त्यांनी पश्चिम विभागाविरुद्ध चार फलंदाज बाद केले. या स्पर्धेत त्यांची सर्वोत्तम गोलंदाज म्हणून निवड झाली. येथून त्यांचा त्यांचा झंझावाती प्रवास सुरू झाला. सुरुवातीच्या काळात त्यांनी किशन दयाल यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे बारकावे आत्मसात केले. तसेच पटियाला येथून त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटचा श्रीगणेशा केला. त्यानंतर त्यांनी दक्षिण पंजाबचेही प्रतिनिधित्व केले. 1963 साली त्यांनी दिल्लीकडे प्रयाण केले. दहा वर्षांनंतर हरयाणासाठी जिवाचे रान केले. 1964-65 साली त्यांनी सिलोनविरुद्ध अनधिकृत कसोटी सामना खेळले. अहमदाबाद येथे झालेल्या त्या सामन्यात त्यांनी 33 धावा देत चार फलंदाजांना बाद करून आपली चुणूक दाखवली होती. राजिंदर गोयल यांचा जन्म ज्या काळात झाला त्या काळात हिंदुस्थानी संघात एकापेक्षा एक असे सरस फिरकी गोलंदाज होते. यामध्ये चंद्रशेखर, इरापल्ली प्रसन्ना, एस. वेंकटराघवन, बिशनसिंग बेदी या खेळाडूंचा समावेश होता. बिशनसिंग बेदी व राजिंदर गोयल यांची गोलंदाजी शैली एकच असल्यामुळे त्यांच्यासाठी हिंदुस्थानी संघाचे दरवाजे उघडले नाहीत असे काही तज्ञांचे मत असून काहींना वाटते की, एकाच वेळी इरापल्ली प्रसन्ना व एस. वेंकटराघवन हे ऑफस्पिनर गोलंदाज संघात खेळू शकत होते, तर मग बिशनसिंग बेदी व राजिंदर गोयल या डावखुऱया गोलंदाजांना एका तरी सामन्यात संघात एकत्र खेळवायला हरकत नव्हती. राजिंदर गोयल यांनी आपल्या कारकीर्दीत पटियाला, दक्षिण पंजाब, दिल्ली व हरयाणा या चार संघांचे प्रतिनिधित्व केले. या दरम्यान त्यांनी 123 सामन्यांमधून विक्रमी 637 फलंदाजांना बाद केले. 1958 ते 1984 या कालावधीत 27 मोसमात त्यांनी ही करामत करून दाखवली. रणजी स्पर्धेत सर्वाधिक फलंदाज बाद करण्याच्या यादीत ते पहिल्या स्थानावर असून त्या खालोखाल एस. वेंकटराघवन (530 बळी) यांचा क्रमांक लागतो. रणजी स्पर्धेत त्यांनी एका सामन्यात 17 वेळा दहा किंवा त्यापेक्षा जास्त फलंदाज बाद केले. तसेच 53 वेळा पाच किंवा त्यापेक्षा जास्त फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. हाही एक विक्रमच. एवढेच नव्हे तर रणजी स्पर्धेत त्यांनी अवघ्या 17.28 च्या सरासरीने गोलंदाजी केली हे विशेष. राजिंदर गोयल यांच्याबदल पद्माकर शिवलकर असे म्हणाले की, ‘राजिंदर गोयल व मी काही लढतींत एकमेकांविरुद्ध खेळलो. आम्हा दोघांना एकमेकांबद्दल आदर होता. त्या काळात फिरकी गोलंदाज फ्लाईट व लूपद्वारे फलंदाजांना चकवण्याचा प्रयत्न करीत असत. पण राजिंदर गोयल हे वेगळ्या प्रकारचे गोलंदाज होते. ते एकाच टप्प्यात चेंडू टाकायचे. फलंदाजांना बांधून ठेवायचे. पुढे येऊन फटका मारायला द्यायचे नाही. ही त्यांची विशेषतः होती. राजिंदर गोयल हे गुणी गोलंदाज होत. कसोटी क्रिकेटमध्येही ते रणजीप्रमाणेच भरीव कामगिरी करू शकले असते मात्र नशीबाने त्यांना ती संधीच मिळाली नाही. एक गुणी पण काहीसे कमनशिबी अशीच त्यांची नोंद क्रिकेटच्या इतिहासात राहील.