आता चिनी सायबर हल्ल्याची भीती अधिक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान आणि चीनच्या नियंत्रण रेषेवरील वाढत असलेला तणाव लक्षात घेता हिंदुस्थानने चीनच्या तब्बल 59 ऍप्सवर बंदी घालत चीनला दणका दिला आहे. या ऍप्समुळे देशातील सार्वभौमत्वता, एकता आणि एकात्मतेवर आक्रमण करीत असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. हिंदुस्थानच्या या निर्णयानंतर आता चीन हिंदुस्थानवर अधिक प्रमाणात सायबर हल्ला चढवू शकतो, अशी भीती तज्ञांकडून वर्तविण्यात आली आहे.

चीन सरकारकडून हिंदुस्थानला लक्ष्य केले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याठिकाणी सरकारच्या परवानगी शिवाय काम करणे कठीण आहे. तेथील हॅकरदेखील सरकारच्या संस्थांशी निगडित असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यातच कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव आणि हिंदुस्थान आणि चीनमध्ये सीमारेषवर वाढत असलेला तणाव लक्षात घेता सायबर हल्ल्याची भीती अधिक असल्याचे आता म्हटले जात आहे. काही महिन्यांपूर्वी ऑस्ट्रेलियावर साबयर हल्ला चढविण्यात आला होता.

चीन चिंतेत

हिंदुस्थान सरकारने टिकटॉकसह 59 चिनी ऍप्सवर बंदी घातल्यानंतर चीन सरकार चिंतेत पडले आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने त्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ‘ऍप्सवरील बंदीनंतर आम्ही चिंतेत असून परिस्थितीची पडताळणी सुरू आहे.’ असे प्रवत्ते झाओ लिजियन यांनी म्हटले आहे.