
गेले तीन ते चार दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने सोमवारपासून पुन्हा जोर धरला असून आजही पावसाची संततधार कायम आहे. पावसाने पुनरागमन केल्याने बळीराजा मात्र सुखावला आहे. गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात 61.52 च्या सरासरीने 492.2 मीमी पाऊस पडला आहे. तर सर्वाधिक पाऊस कुडाळ तालुक्यात 117 मी मी पडला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाऊस पडायला सुरुवात झाल्याने बळीराजा सुखावला होता. त्यामुळे भात लावणीच्या कामालाही सुरुवात केली होती. मात्र लावणीच्या कामाने वेग धरला असतानाच गेले काही दिवस पावसाने विश्रांती घेतल्याने भात सुकत आले होते. त्यामुळे शेतकरी चिंतेत होता. आता मात्र शेतकर्यांच्या डोक्यावरील चिंतेचे ढग दूर झाले आहेत. कारण आता जिल्ह्यात पावसाचे मुसळधार आगमन केले आहे. आजही जिल्ह्यात पावसाची संततधार कायम आहे. त्यामुळे शेतकर्यांनी पुन्हा भात लावणीच्या कामाला जोरात सुरुवात केली आहे. 1 जून पासून ते आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी 1149.62 मि.मी. पाऊस पडला.

























































