
बॉलीवूड अभिनेत्री जुही चावला सोशल मीडियावर तिच्या बिनधास्त बोलसाठी प्रसिद्ध आहे. आज पुन्हा एकदा एका ट्विटमुळे जुही चर्चेत आलेय. तिने भाज्यांच्या होम डिलिव्हरीचे फोटो शेअर करत काहीशा संतापाने ट्विट केलंय. ’अशा पद्धतीने भाज्या घरी आल्यात… प्लॉस्टिकमध्ये गुंडाळलेल्या…शिकलेली लोकच पृथ्वीवर अशी घाण करतात. मला कळत नाही, हसू की रडू…’ असं जुहीने लिहिलंय. तिच्या या ट्विटवर नेटिजन्स मोठय़ा संख्येने प्रतिक्रिया देत आहेत. जुहीच्या घरी आलेल्या भाज्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये गुंडाळलेल्या आहेत. त्यामुळेच ती चिडली आहे. जुही पर्यावरणप्रेमी कार्यकर्ता आहे. ती मित्रांना त्यांच्या वाढदिवसाला स्वत: लावलेली रोपटी गिफ्ट देत असते. यावरून निसर्गाप्रति असलेले तिचे प्रेम लक्षात येतं. पर्यावरणाच्या समस्येवर ती अनेकदा आवाज उठवते, लोकांना जागृत करताना दिसते.



























































