गोदावरी काँक्रिटीकरणमुक्त करताना प्राचीन कुंडे सुरक्षित ठेवा,गोदाप्रेमी सेवा समितीची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोदावरी नदीपात्राच्या तळाचे काँक्रिटीकरण काढताना सवातीनशे वर्षे प्राचीन कुंडांना कोणतीही इजा होऊ न देता ते मूळ स्वरूपातच पुनर्जीवित करा,अशी मागणी गोदाप्रेमी नागरी सेवा समितीचे देवांग जानी यांनी स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थवील यांच्याकडे केली आहे.

 तीर्थक्षेत्र असलेल्या नाशिकमधील पवित्र श्रीरामकुंड येथे देशभरातून भाविक पूजाविधीसाठी येत असतात. या गोदावरी नदीपात्रातील काँक्रिटीकरण काढण्याची मागणी पर्यावरणप्रेमींनी केली होती. सध्या नाशिक स्मार्टसिटीच्या’प्रोजेक्ट गोदा’अंतर्गत नदीपात्रातील दुतोंडय़ामारुती ते संत गाडगे महाराज पूलापर्यंत नदीच्या तळाचे काँक्रिटीकरण काढण्याचे काम सुरू आहे. या नदीपात्रात सवातीनशे वर्षांपूर्वीची 17 कुंडे आहेत. पहिल्या टप्प्यात काम सुरू असलेल्या भागात अनामिक, दशाश्वमेघ, रामगया, पेशवे आणि खंडोबा कुंडांचा समावेश आहे. पोकलॅण्ड मशीनच्या ब्रेकर्सने पात्रामध्ये पाणी तसेच असताना काम केले जात आहे. मात्र, नदीपात्र कोरडे करून हे काम करणे गरजेचे होते. यादरम्यान कुंडांचे दगड निखळत आहेत, हे देवांग जानी यांनी निदर्शनास आणून दिले. कुंडांना कोणतीही इजा न करता मूळ स्वरूपात ते पुनर्जीवित करा, पोकलॅण्डच्या ब्रेकर्सऐवजी हॅण्डब्रेकर्सचा वापर करा, कुंडांचे खोलीकरण करू नका, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

नाशिकच्या गोदावरी नदीवरील पवित्र श्रीरामकुंड परिसरात काँक्रिटीकरण काढण्याचे काम सुरू आहे. या काँक्रिटीकरणातील लोखंडी गज काढून घेण्याचे कामही भंगार विक्रेत्यांकडून सुरू आहे.