ज्येष्ठ पत्रकार विकास काटदरे यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्येष्ठ पत्रकार व दैनिक ‘सामना’चे डोंबिवली प्रतिनिधी विकास काटदरे यांचे आज सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे ठाणे जिल्ह्यातील पत्रकारांमध्ये तीव्र दुःख व्यक्त होत आहे.

विकास काटदरे हे आधी साप्ताहिक ‘मार्मिक’ आणि त्यानंतर दैनिक ‘सामना’च्या प्रारंभापासून वार्ताहर म्हणून काम करत होते. त्यांनी `सामना’मध्ये विविध विषयांवर प्रासंगिक लिखाणदेखील केले. कल्याण, डोंबिवलीतील पत्रकारितेचा चालताबोलता इनसायक्लोपिडिया अशी त्यांची ओळख होती. काटदरे यांनी सुरुवातीच्या काळात परळ येथील आर.एम. भट शाळेत शिक्षक म्हणून काम केले. आज दुपारच्या सुमारास त्यांना अचानक श्वास घेण्यास त्रास सुरू झाला. डोंबिवलीतील खाजगी रुग्णालयात त्यांना दाखल केले पण त्यांची प्राणज्योत मालवली. काटदरे यांच्या पश्चात एक मुलगा आहे.

मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली
ज्येष्ठ पत्रकार विकास काटदरे यांच्या निधनाने गेली अनेक वर्षे पत्रकारिता व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेला व्रतस्थ हरपला आहे. डोंबिवलीतील अत्यंत अभ्यासू व जाणते पत्रकार म्हणून त्यांचा लौकिक होता. पत्रकारितेमधील त्यांचे योगदान नवोदितांना एक आदर्श असून राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मी काटदरे यांना श्रद्धांजली अर्पण करतो असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.