
सर्व इयत्तांचे, विषयांचे ई-साहित्य लवकरच यू-टय़ूब चॅनेलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याबाबत सविस्तर सूचना जाहीर करण्यात येईल, असे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर पाटील यांनी स्पष्ट केले आहे. तसेच जिओ ज्ञानगंगा चॅनेल तसेच जिओ सावन रेडिओ प्लॅटफॉर्मकरून शिक्षणाचे धडे विद्यार्थ्यांना मिळणार असून त्याचे वेळापत्रकही जाहीर होईल, असेही पाटील यांनी सांगितले.
राज्यातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, यासाठी शालेय शिक्षण विभागाने शिक्षणाची विविध माध्यमे उपलब्ध करून दिली आहेत. नुकतेच जिओच्या टीव्ही माध्यमाचे उद्घाटन शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. जिओ टीव्हीच्या माध्यमातून बारावि विज्ञान शाखेच्या तसेच दहावीच्या मराठी व इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानगंगा चॅनेल सुरू करण्यात आले आहे. तसेच जिओ सावन या रेडिओ प्लॅटफॉर्मकरून शिक्षणाचे धडे देण्यात येणार आहेत.
– जिओ टीव्हीद्वारे दररोज 6 तास अध्यापनाच्या तासिकांचे प्रसारण केले जाणार आहे.
– सहा तासांतील शिकवणी वर्गाचे दिवसातील उर्वरित 18 तास पुनर्प्रक्षेपण होणार आहे.
– या तासिकांविषयीचे वेळापत्रक www.maa.ac.in या वेबसाईटवर लवकरच जाहीर केले जाणार आहे.
– दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ‘जिओ सावन’वर बोलकी पुस्तके उपलब्ध होणार.
दहावी उर्दू माध्यमासह तिसरी ते नववीच्या मराठी, इंग्रजी, उर्दू माध्यमांसाठी जिओ चॅनेल सुरू होणार आहे.
जिओ टीव्ही पाहण्यासाठी
– जिओ मोबाईल क्रमांक व इंटरनेट असणे आवश्यक.
– प्ले स्टोअर किंवा my jio tv करून जिओ टीव्ही ऍप डाऊनलोड करावे.
– ऍपवर लॉग इन करण्यासाठी जिओ मोबाईल क्रमांकावर – आलेला ओटीपी सबमिट करावा.
– categories या पर्यायांमधून educational (65) हा पर्याय निवडावा
– scroll करून ज्ञानगंगा दहावी (मराठी), ज्ञानगंगा दहावी (इंग्रजी), बारावी (विज्ञान) यांपैकी चॅनेल निवडा.
रेडिओ ऐकण्यासाठी
– जिओ साकन हे रेडिओ ऍप व इंटरनेट हवे.
– प्ले स्टोअरवरून जिओ सावन ऍप डाऊनलोड करावे.
– podcast मधून महावाणी हा ऑप्शन निवडावा.
पालकांवर जिओ सिम कार्ड घेण्याची सक्ती नाही
जिओ टीव्ही आणि जिओ सावनच्या माध्यमातून अभ्यास करण्यासाठी विद्यार्थी, पालकांवर जिओचे सिम कार्ड घेण्याची सक्ती करण्यात आलेली नाही, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे जिओचे सिम कार्ड नाही, अशा विद्यार्थ्यांनी काळजी करण्याची आवश्यकता नाही. येत्या काळात अन्य मोबाईल सेवा पुरवठाधारकांच्या माध्यामातून ई-साहित्य पुरविण्यात येणार आहे.























































