राज्यात कोरोनाचे 6603 नवीन रुग्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या 4634 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून बरे झालेल्यांची एकूण संख्या 1 लाख 23 हजार 192 झाली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 55.06 टक्के एवढे आहे. आज कोरोनाच्या 6603 नवीन रुग्णांचे निदान झाले असून 91 हजार 65 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी आज दिली.

राज्यात आज 198 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 4.22 टक्के एवढा आहे. राज्यात नोंद झालेले 198 मृत्यू हे मुंबई मनपा-62, ठाणे-28, नवी मुंबई मनपा-8, पालघर-3, रायगड-3, पनवेल मनपा-3, नाशिक मनपा-5, नगर-1, जळगाव-8, जळगाव मनपा-2, पुणे-4, पुणे मनपा-27, पिंपरी-चिंचवड मनपा-5,सोलापूर मनपा-8, सातारा-8, कोल्हापूर-3, सांगली-मिरज-कुपकाड मनपा-2, संभाजीनगर-3, संभाजीनगर मनपा-5,जालना-3, बीड-1, नांदेड-2, अकोला मनपा-2, यवतमाळ-1, नागपूर मनपा-1 अशी आहे.

मुंबईत 1381 नवे रुग्ण, 62 जणांचा मृत्यू
मुंबईत एका दिवसात कोरोनाचे 1381 नवे रुग्ण सापडले असून गेल्या 48 तासांत 62 जणांचा मृत्यू झाला आहे तर गेल्या 24 तासांत 1101 जण कोरोनामुक्त झाले असून मुंबईत एकूण कोरोनामुक्त होणार्यांची संख्या आता 59 हजार 238 वर पोहोचली आहे. मुंबईतील गेल्या 48 तासांत 62 जणांचा मृत्यू झाला असून मुंबईतील एकूण मृतांची संख्या आता 5 हजार 061 झाली आहे

मुंबईत आतापर्यंत 3 लाख 64 हजार चाचण्या, रुग्ण संख्याही नियंत्रणात

कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने सुरुवातीपासूनच अधिकाधिक चाचण्यांवर भर दिला असून गेल्या सहा महिन्यांत मुंबईत 3 लाख 64 हजार चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यासाठी टप्प्याटप्याने खासगी लॅब आणि पालिका रुग्णालयांत कोरोना लॅब सुरू करून चाचण्यांची क्षमता वाढवली आहे. वाढवलेल्या कोरोना चाचण्या आणि जलद गतीने सुरू असलेल्या उपचारांमुळे रुग्णसंख्याही नियंत्रणात ठेवण्यात मुंबई महानगरपालिकेला यश आले आहे.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या निर्देशांचे योग्य पालन करून चाचण्या केल्या आहेत. मुंबईत 3 फेब्रुवारीला पहिली कोरोना चाचणी करण्यात आली तर 11 मार्चला पहिला कोरोना रुग्ण सापडला. 3 फेब्रुवारी ते 6 मे 2020 या कालावधीमध्ये 1 लाख चाचण्या झाल्या तर 1 जूनला 2 लाख चाचण्यांचा टप्पा गाठला गेला. 24 जूनपर्यंत 3 लाख चाचण्यांचा टप्पा पूर्ण झाला. आजपर्यंत एकूण 3 लाख 64 हजार 753 चाचण्या झाल्या आहेत, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली.