
कुस्तीपटू म्हटला की, त्याचा खुराक व फिटनेस डोळ्यांसमोर येतो. या दोन बाबींशिवाय कोणताही कुस्तीपटू परिपूर्ण होऊच शकत नाही. मात्र, कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फटका कुस्तीपटूंनाही बसला. बहुतांशी कुस्तीपटू हे खेडेगावातील असल्यामुळे खुराक व जिमपासून त्यांना वंचित राहावे लागले. याप्रसंगी दैनिक ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत ‘महाराष्ट्र केसरी’ हर्षवर्धन सदगीर याने याबाबत नाराजी व्यक्त केली.
मार्च ते मे महिन्यांतील कुस्त्या रद्द झाल्या अन्…
– ‘मार्च ते मे या महिन्यांमध्ये यात्रेतील मातीतल्या कुस्त्या पार पडत असतात. या कुस्त्यांच्या साहाय्याने आमच्यासारख्या कुस्तीपटूंचे घरही चालते. मात्र, हिंदुस्थानात मार्च महिन्यापासून लॉकडाऊन करण्यात आले आणि आमच्या आर्थिक परिस्थितीत फरक पडत गेला,’ अशी खंत हर्षवर्धन सदगीर याने यावेळी व्यकेली.
नोकरी मिळाल्यास स्थिरता येईल
– ‘मी आई-वडील व मोठय़ा भावासह नाशिक येथे वास्तव्य करतो. वडील शाळेत नोकरी करीत शेतीही सांभाळतात. भाऊ ‘यूपीएससी’ची तयारी करीत आहे. पण सध्या शाळा बंद आहेत. कुटुंबाचा उदरनिर्वाह माझ्याकरच अवलंबून आहे. आतापर्यंत तरी सर्व व्यवस्थित सुरू आहे. यापुढेचे माहीत नाही. मला नोकरी मिळावी, अशी माझी महाराष्ट्र सरकारकडे विनंती आहे. नोकरी मिळाल्यास स्थिरता येईल. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचे स्वप्नही पूर्ण करता येईल. कारण याप्रसंगी आर्थिक स्थितीचे कोणतेही टेन्शन नसेल,’ असे हर्षवर्धन सदगीर पुढे आवर्जून सांगतो.
– युवा कुस्तीपटूंनी मनातील भीती काढून टाकावी
– ‘युवा कुस्तीपटूंनी कोरोनामुळे आपले करिअर संपुष्टात येईल, अशी भीती मनामध्ये बाळगायला नको. कोरोनावर मात करून पुढच्या आव्हानासाठी सज्ज राहायला हवे. कोरोनाचे संकट हे कायमस्वरूपी आपल्यासोबत नसेल, हे त्यांनी लक्षात ठेवायला हवे,’ असेही हर्षवर्धन सदगीर म्हणाला.
‘बॉडी कॉण्टॅक्ट’ खेळ असल्यामुळे…
– ‘कुस्ती या खेळामध्ये खेळाडू एकमेकांच्या संपर्कात येतात. हा ‘बॉडी कॉण्टॅक्ट’ खेळ आहे. त्यामुळे कोरोनामध्ये सावरण्यासाठी थोडा वेळ लागेल. पण दोन ते तीन महिन्यांत सरावाला सुरुवात होऊ शकते. सर्वात आधी सीनियर राष्ट्रीय स्पर्धेसाठी आम्हाला रेडी राहावे लागणार आहे. तसेच त्यानंतर ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धाही असेल,’ असे सांगणारा हर्षवर्धन सदगीर पुढील आव्हान समर्थपणे परतवून लावण्यासाठी सज्ज झाल्याचे दाखवून देतो.
























































