
हिंदुस्थानात दहशतवादी कारवाया घडविण्याचा कट पुण्यातून अटक केलेल्या दोघांनी रचला असल्याचे राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) तपासात उघड झाले आहे. ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याच्या कारणावरून रविवारी ‘एनआयए’ने येरवडा आणि कोंढव्यातून महिलेसह दोघांना अटक केली होती. नबील एस. खत्री (वय 27, रा. कोंढवा ) आणि सादिया अन्वर शेख (वय 22, रा. फुलेनगर, येरवडा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ‘एनआयए’ने दिलेल्या माहितीनुसार, नबील खत्री पुण्यात व्यायामशाळा चालवित होता, तर सादिया शेख बारामती येथे एका महाविद्यालयात मास कम्युनिकेशन्स ऍण्ड जर्नालिझमच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे.






























































