
जिवाची मुंबई करायला झटपट पैसा कमावण्यासाठी एक टोळी बनवून दुचाकी चोरणाऱया एका हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्याला मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 11 ने रंगेहाथ पकडले. त्याच्या अन्य दोघा साथीदारांनाही पकडून चोरीच्या पाच दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. आरोपींपैकी एक अल्पवयीन मुलगा आहे.
मोहम्मद अली इम्तियाज आंधळे (19) आणी अफजल अक्सर खान (19) अशी आरोपींची नावे असून आंधळे हा टोळीचा म्होरक्या आहे. आंधळे सध्या हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतोय. पार्क केलेल्या दुचाकींवर पाळत ठेवून संधी मिळताच बनावट चावीने ती दुचाकी चोरणारी एक टोळी उत्तर मुंबईत सक्रिय असून त्यातील दोन चोरटे चोरीची दुचाकी विकण्यासाठी मालाड येथे येणार असल्याची खबर युनिट 11 ला मिळाली. त्यानुसार उपायुक्त अकबर पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट इन्चार्ज चिमाजी आढाव, पोलीस निरीक्षक रईस शेख, एपीआय शरद झिने, विकास पाटील तसेच दिलीप पाटील, सत्यनारायण नाईक आणि रिया आणेराव या पथकाने मालाडमध्ये सापळा रचून चोरीची दुचाकी विकायला आलेल्या आंधळे, खान आणि त्यांच्या अल्पवयीन साथीदाराला रंगेहाथ पकडले.
अर्ध्या किमतीत विकून करायचे मौजमजा
कॉलेज विद्यार्थ्यांमध्ये बाईकचे असलेले वेड हेरून झटपट पैसा कमावण्यासाठी आंधळे याने अन्य दोघांना हाताशी घेऊन बाईक चोरण्यास सुरुवात केली. एखाद्या विद्यार्थ्याला सेकंड हॅण्ड बाईक पाहिजे हे समजल्यावर आंधळे त्यानुसार बाईक चोरायचा. मग त्या बाईकमध्ये थोडेफार बदल करून तिला अर्ध्या किमतीत विकायचा. गेल्या दोन वर्षांपासून त्याचा हा प्रकार सुरू आहे. मिळालेल्या पैशांतून आरोपी मौजमजा करायचे.



























































