संकटाला धैर्याने सामोरे जा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विशाल देवरुखकर, दिग्दर्शक

लॉकडाऊन  इतके दिवस वाढेल हे कुणालाच माहीत नव्हते. स्वतःला आणि कुटुंबीयांना भरपूर खूप वेळ देता येणार असल्याने सुरुवातीला मी खुश होतो. फिट राहण्यासाठी वॉकिंग केले. मन प्रसन्न ठेवण्यासाठी आवडती गाणी ऐकली. न्यूज चॅनेलपासून चार हात लांब राहिलो. फक्त माहितीपुरत्या बातम्या पाहिल्या. लेखक, दिग्दर्शक म्हणून मला पुढच्या चित्रपटांचा विचार करायला, नवनवीन कॉन्सेप्ट डेव्हलप करायला निवांत वेळ मिळाला. गोष्टी वेळेत देण्याची, शुटींग वेळेत पूर्ण करण्याची कसलीही घाई गडबड नव्हती.

गेल्या तीन ते चार महिन्यांत मी तब्बल 17 ते 18 गोष्टींवर विचार केला. त्यात 3 हिंदी वेबसिरीज आहेत. या गोष्टी प्रेक्षकांपुढे आणण्याचा त्यादृष्टीने निर्माते, ओटीटी प्लॅटफॉर्मसोबत ऑनलाईन मीटिंग झाल्या. काही गोष्टी त्यांना आवडल्या… काहींमध्ये त्यांना हवे तसे बदल करून दिले. आगामी ‘बॉईज 3′, ‘धुक्यात धोका’, ‘लव्ह इन धारावी’ या सिनेमाच्या शूटिंगचे नियोजन केले. एकंदरीत या सुट्टीचा खूप फायदा मला माझ्या करीयरच्यादृष्टीने झाला आहे. या सगळ्यांमध्ये सुरुवातीचे दिवस खूप छान गेले.

कोरोनाचे संकट कधी, कुणावर आणि कसे येईल हे सांगता येत नाही. माझे बालपण धारावीतले. येथे राहणाऱ्या माझ्या कुटुंबातील अगदी जवळच्या सदस्यांना देखील कोरोना झाला. त्यामुळे मधले 15 दिवस मी थोडासा डिस्टर्ब होतो. त्यांना भेटायला देखील जाऊ शकत नव्हतो. केवळ फोनवरच तब्येतीची विचारपूस व्हायची. डॉक्टरांशी बोलणे व्हायचे. अशा परिस्थितीत शांत राहणे आणि सकारात्मक विचार करणे हाच पर्याय माझ्यापुढे होता. तुमची आवडच तुम्हाला एखाद्या संकटातून बाहेर काढू शकते याबाबत मी आजवर ऐकले होते. या संकटात मी ते प्रत्यक्षात अनुभवले.

सिनेमा पाहणे ही माझी लहानपणापासूनची आवड. याच आवडीपोटी मी या क्षेत्राकडे वळलो. या दरम्यान मी अनेक सिनेमे, वेबसिरीज पहिल्या. नवनवीन गोष्टींचा विचार केला. त्यात हे दिवस कसे निघून गेले कळलेच नाही. पालिका कर्मचारी, डॉक्टरांच्या रूपाने देवच आमच्या मदतीला धावून आला. त्यांच्या प्रयत्नामुळे सुदैवाने माझे कुटुंबीय सुखरूप घरी आले. काही दिवसांपूर्वी कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या धारावीची दखल डब्ल्यूएचओने घेतली. ही धारावीकर म्हणून माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे.

आजार डोक्यात जाऊ देऊ नका!

खरं सांगायचं तर, आता कोरोनाबद्दलची मनातली भीतीच नाहीशी झाली आहे. हा आजार बरा होऊ शकतो… फक्त तुमची रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवा. या दरम्यान आणखी गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे कोणताही आजार हा शरीराच्या आधी आपल्या मेंदूत मोठा होत असतो. त्यामुळे सतत विचार करून तो आजार डोक्यात जाऊ देऊ नका!