सराव शिबिरासाठी टेबलटेनिसपटूंचा नकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाचा धसका हिंदुस्थानातील टेबल टेनिसपटूंनी घेतला आहे. टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडियाकडून (टीटीएफआय) येत्या 1 ऑगस्टपासून राष्ट्रीय शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. बंगळुरूच्या साई सेंटरमध्ये हे शिबिर भरवण्यात येणार आहे. मात्र हिंदुस्थानात कोरोना वाढत चालल्यामुळे बहुतांशी टेबल टेनिसपटूंनी या शिबिरात सहभागी न होण्याचे ठरवले आहे. एका दैनिकामधून हे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे.

हिंदुस्थानचा नंबर वन टेबल टेनिसपटू शरथ कमाल यावेळी म्हणाला की, कोरोनामुळे पुढल्या वर्षी जानेवारीपर्यंत कोणतीही आंतरराष्ट्रीय स्पर्धा होणार नाहीए. ऑलिम्पिक पात्रता फेरीही एप्रिल महिन्यात होणार आहे. तसेच देशांतर्गत स्पर्धाही ऑक्टोबर महिन्यापासून सुरू होणार आहेत. त्यामुळे घाईघाईत सराव शिबिर घेणे उचित ठरणार नाही, असेही शरथ कमाल याला वाटते.

क्वारंटाईनचा कालावधी काढून टाका! क्वारंटाईनमुळे 15 दिवसांचा कॅम्प अडचणीचा
अॅथलेटिक्स व हॉकी यांसारख्या खेळांमध्ये खेळाडूंसाठी प्रदीर्घ शिबिराचे आयोजन करण्यात येते. मात्र टेबल टेनिसपटूंसाठी फक्त 15 दिवसांच्या कॅम्पचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी आम्हाला 14 दिवस क्वारंटाईनमध्ये राहावे लागणार आहे. त्यानंतर पॅम्प संपल्यानंतर घरी आल्यावरही 14 दिवसांमध्ये विलगीकरणात राहावे लागेल. हे थोडे अडचणीचेच ठरणार आहे. या नियमात बदल करायला हवा. खेळाडूंची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना सराव शिबिरात सहभागी होण्याची परवानगी द्यायला हवी, क्वारंटाईनचा कालावधी काढून टाकण्यात यावा असे मत देशातील स्टार खेळाडू जी. साथीयान याने यावेळी व्यक्त केले.