24 तास बातम्या देणाऱ्या वृत्तवाहिन्यांमध्ये वृत्तनिवेदिका देखणे असाव्यात असा अट्टहास असतो. यासाठी चांगली वेशभूषा, मेकअप, केशरचना केली जाते. काही वृत्तनिवेदिका या हाडाच्या पत्रकार असतात आणि कोणत्याही स्थितीमध्ये त्या आपला तोल ढळू न देता बातम्या वाचण्याचे काम चोखपणे बजावतात. एका वृत्तवाहिनीच्या वृत्तनिवेदिकेचा बातम्या वाचत असताना अचानक दात पडला. तो दात तिने हातात धरला आणि बाजूला ठेवत बातम्या वाचण्याचे तिचे काम सुरूच ठेवले.
Maricha Padalko मारिया पडाल्को असं या वृत्तनिवेदिकेचे नाव आहे. ती युक्रेनच्या एका वृत्तवाहिनीमध्ये काम करते. कोरोनासंदर्भातील बातमीपत्र सुरू असताना अचानक तिचा दात बाहेर आला. तिने प्रसंगावधान राखत दात हातात धरून हळूच बाजूला ठेवला आणि ती बातम्या वाचत राहिली. तिने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला असून त्यात तिने लिहिले आहे की यामुळेच लाईव्ह ब्रॉडकास्टींग हे अद्भुत आहे, कारण यात काहीही होऊ शकतं. या अवघड परिस्थितीतही तिने चेहऱ्यावरचे भाव ढळू दिले नाही, याबद्दल तिचं कौतुक केलं जात आहे.
20 वर्ष मारिया वृत्तनिवेदिकेचे काम करत आहे. आजपर्यंत आपल्यावर असा प्रसंग कधीच आला नसल्याचे तिने सांगितले आहे. मारिया ही 3 मुलांची आई असून 10 वर्षांपूर्वी तिचा दात तुटला होता. तिची मुलगी घड्याळासोबत खेळत असताना ते घड्याळ मारियाच्या दातावर आपटलं होतं, यामुळे तिचा दात तुटला होता.