
लॉकडाऊन असताना भाजी खरेदी करायला बाजारात गर्दी कशाला करतात? अहो तुमच्या आजूबाजूला, रानमाळावर निसर्गानेच रोगप्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या भाज्या निर्माण केल्या आहेत. कोकणातील रानमाळावर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात रानभाज्या उगवतात. अत्यंत चविष्ट, निसर्गाची देणगी असलेल्या औषधी रानभाज्या कोविडवर मात करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत. रानभाज्यांमध्ये लोह, कॅल्शियम, बीटा कॅरोटीन, जीवनसत्व ‘अ’, जीवनसत्व ‘ड’, मॅग्नेशिअम रेवोप्लॅविन, फॉलिक ऍसिड असते त्यामुळे शरीरातील रोगप्रतिकार क्षमता वाढण्यास सहकार्य होते असे मत आयुर्वेदिक डॉक्टर मुक्तेश्वरी पाखरे यांनी ‘दैनिक सामना’शी बोलताना सांगितले.
डॉ.मुक्तेश्वरी पाखरे यांचे आयुर्वेद एम.डी.शिक्षण झाले आहे.पावसाळ्यात रानमाळावर, जंगलात उगवणाऱ्या रानभाज्यांचे मानवी शरीरासाठी असलेले औषधी महत्व त्यांनी सांगितले आहे. टाकळा, सुरण, कारटोली, केणा, कुडा, करंदा, हादगा, बांबूचा कोंब यांची कुणीही शेती करत नाही.
निसर्गच या औषधी भाज्या भरूभरून देतो. आपल्या पुर्वजांनीच या रानभाज्यातील औषधी महत्व ओळखले आहे. आज अनेक जण रानभाज्या आवडीने खातात. ग्रामीण भागातील लोक जंगलात जाऊन याभाज्या वेचतात आणि शहरात आणून विकतात.
डॉ. मुक्तेश्वरी पाखरे यांनी सांगितले की, करटोलीची भाजी रक्तशर्करा नियंत्रित करते, आघाडा ही भाजी रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास उपयुक्त असून पोटदुखीवर गुणकारी आहे. मोरशेंडच्या कोवळ्या पानांची भाजी करतात ही भाजी रक्तातील युरिक ॲसिडचे प्रमाण कमी करते. श्वसननलिका दाह टाळण्यासाठी नळीची भाजी उपयुक्त आहे टाकळ्याची भाजी ख़ाल्ल्याने कफ व्याधी कमी होते. सुरणच्या भाजीतून कॅल्शियम मिळते त्यामुळे हाडे मजबूत होतात असे डॉ.मुक्तेश्वरी पाखरे यांनी सांगितले.
लॉकडाऊनमध्ये प्रत्येक वेळी बाजारात जाऊन भाजी आणण्याकरिता गर्दी करण्यापेक्षा तुमच्या घराच्या आजूबाजूला, रानमाळावर, रस्त्याच्या शेजारी, शेताच्या बांधावर रानभाज्या उगवतात. या भाज्या कोविड-19 च्या प्रादुर्भावाला प्रतिबंध करण्यासाठी आणि रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास मदत करतात.


























































