शब्दमुद्रा – लोकसंस्कृतीचा कल्पवृक्ष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रा. डॉ. प्रकाश खांडगे

संतसाहित्य आणि लोकसाहित्य यांचे अनुबंध शोधण्याचा विषय असो अथवा मातृदेवतेचं गहन सांस्कृतिक सत्य शोधण्याचा आणि त्यांना समर्पक आयाम देण्याचा प्रयत्न असो, सांस्कृतिक इतिहासाचा धांडोळा घेताना त्या विशिष्ट देवदेवता, परंपरा यांच्या संदर्भातल्या मौखिक साहित्याच्या भावगर्भतेचा विचारही अत्यावश्यक असतो अशी संशोधकीय दृष्टी डॉ. ढेरे सर यांनी आपल्या लेखनात शेवटच्या श्वासापर्यंत रुजविली. 21 जुलै रोजीच्या त्यांच्या 90 व्या जयंतीनिमित्त हा लेख.

कसाहित्य, लोकसंस्कृती, धर्मेतिहास, देवता, वैज्ञानिक इतिहास, संत वाङ्मय अशा वेगवेगळ्या ज्ञानशाखांना आपल्या प्रतिभास्पर्शाने तसेच साक्षेपी संशोधन दृष्टीने नवा आयाम देणारे ज्येष्ठ संशोधक डॉ. रामचंद्र चिंतामण ढेरे म्हणजे आमच्या लोकसाहित्य परिवारातील आमचे अण्णा 21 जुलै 2020 रोजी 90 व्या वर्षात पदार्पण करते झाले असते. अण्णा गेले आणि हिंदुस्थानी सांस्कृतिक ज्ञानशाखांच्या पल्लवित शाखांना अधिक पल्लवित करणारा एक महत्त्वाचा दुवा निखळला. आपल्या लालित्यपूर्ण लेखन शैलीने संशोधनाच्या दुस्तर वाटा सुकर करणाऱया या ज्येष्ठ संशोधकाने राजवाडे, केतकर, इरावतीबाई कर्वे, दत्तो वामन पोतदार, डॉ. दुर्गा भागवत अशा देदीप्यमान व्रतस्थ संशोधकांच्या परंपरेला अधिकाधिक समृद्ध केले.

संतसाहित्य आणि लोकसाहित्य यांचे अनुबंध शोधण्याचा विषय असो अथवा मातृदेवतांच्या गहनगूढ गाभाऱयातील सांस्कृतिक सत्ये शोधण्याचा आणि त्यांना समर्पक आयाम देण्याचा प्रयत्न असो, केवळ ताम्रपट, ऐतिहासिक दस्ताऐवज यातून सांस्कृतिक इतिहासाचा धांडोळा घेता येत नाही, तर त्यासोबत त्या विशिष्ट देवदेवता, परंपरा यांच्या संदर्भातल्या मौखिक साहित्याच्या भावगर्भतेचा विचारही अत्यावश्यक असतो अशी संशोधकीय दृष्टी डॉ. ढेरे सर यांनी आपल्या लेखनात शेवटच्या श्वासापर्यंत रुजविली. त्यांची प्रतिभा देवघरातल्या नंदादीपासारखी प्रभायुक्त! अण्णा तुम्ही आणि संत तुकोबा इंद्रायणीच्या काठावर फिरत चर्चा करीत असता असे मला अनेकदा वाटे असे ढेरे सरांना अनेक वेळा मी सांगत असे तेव्हा ते गालातल्या गालात हसत आणि म्हणत, ‘‘तुझ्या खंडोबाच्या जागरणाच्या संशोधनासाठीची ही सामग्री मी काढून ठेवली आहे. वाघ्यामुरळ्यांची पदे आणि संत साहित्यातील खंडोबा तुझा तुलाच.’’ अण्णा खरोखरच लोकसंस्कृतीचा कल्पवृक्ष होते. त्यांच्यातील संशोधक भाबडा, गहिवर संप्रदायाला उत्तेजन देणारा नव्हता, तर भावगर्भ अलक्षित सांस्कृतिक सत्यांचा धांडोळा घेणारा होता. तर्काच्या सहाणेवर सत्य शोधणाऱया कर्मठ संशोधकांची अहंमन्यता त्यांच्यात नव्हती. त्यांच्या संशोधनाला लालित्याची जोड होती. या लालित्याने बावनकशी संशोधन निष्कर्षांना, चिंतनाला कधी गौणत्व आले नाही.

एका जन्मात हे सारं कसं सिद्ध झालं? हा प्रश्न अण्णांना अनेक वेळा अनेकांनी विचारला असेल. पूर्वसुरींचा आदर राखीत त्यांनी माझ्यासारख्या उमदेवारी करणाऱया अभ्यासकांना नेहमीच मार्गदर्शन केले. किंबहुना, त्यांच्या कृपाछायेत अनेक तरुण अभ्यासक तयार झाले. त्यांची ज्येष्ठ कन्या, माझी गुरुभगिनी डॉ. अरुणा ढेरे त्यांच्याच प्रेरणेतून पुराकथांमधील आदिबंध शोधत राहिली. लोकसाहित्य संशोधन मंडळ आणि लोकसाहित्य परिषद हे उपक्रम लोकसाहित्याचे ज्येष्ठ संशोधक डॉ. प्रभाकर मांडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाले, त्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. ढेरे सरांचे सतत सहकार्य लाभले. डॉ. प्रभाकर मांडे, डॉ. गंगाधर मोर्जे, डॉ. तारा भावळकर, डॉ. मधुकर वाकोडे अशा व्रतस्थ संशोधकांनी अण्णांपुढे धाकुटेपण स्वीकारले.
लोकसंस्कृतीचे उपासक, लोकसंस्कृतीची क्षितिजे, लज्जागौरी, दक्षिणेचा लोकदेव खंडोबा, श्री तुळजाभवानी, श्री विठ्ठल ः एक महासमन्वय, लोकदैवतांचे विश्व, ‘संत, लोक आणि अभिजन’, दत्त संप्रदायाचा इतिहास, नाथ संप्रदायाचा इतिहास, मुसलमान मराठी संतकवी, भारतीय रंगभूमीच्या शोधात, आज्ञापत्र असे अनेक ग्रंथ डॉ. ढेरे सरांनी सिद्ध केले. त्यांच्या या सिद्धतेला पद्मगंधा प्रकाशनाचे अरुण जाखडे यांचे सतत सहकार्य लाभले.

लोकसाहित्याच्या अभ्यासात डॉ. दुर्गा भागवत यांचे ऋण व्यक्त करताना डॉ. ढेरे सर म्हणतात, ‘‘जागतिक पातळीवरील लोकसाहित्याचा शास्त्राrय बैठकीचा परिचय महाराष्ट्राला सर्वप्रथम दुर्गाबाईंनी करून दिला. नुसताच सिद्धांतांचा परिचय नाही, तर हिंदुस्थानच्या संदर्भात त्यांचं उपयोजनही करून दिलं. ज्ञानेश्वरांनी ‘ज्ञानेश्वरी’द्वारे भागवतधर्माला जी वैचारिक बैठक प्राप्त करून दिली, अगदी त्याचप्रमाणे दुर्गाबाईंनी ‘लोकसाहित्याची रूपरेखा’ या ग्रंथाद्वारे लोकसाहित्याच्या अभ्यासाला तात्त्विक बैठक प्राप्त करून दिली.’’ प्रख्यात साहित्यिक जी. ए. कुलकर्णी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात आलेला पुरस्कार स्वीकारताना डॉ. ढेरे सरांनी केलेलं चिंतन अविस्मरणीय आहे. ते म्हणतात-

‘‘अज्ञाताचा वेध घ्यायचा तर सुरक्षितेची जाणीवच प्रथम संपते. एका अंधारात प्रवेश करावा लागतो. रूढ वाटांची निश्चिंतता सोडावी लागते. जीएंसारख्या प्रतिभावंत कथाकाराचा अनुभव कलेच्या क्षेत्रातल्या अनवट मार्गावरच्या इतरही मोजक्या वाटसरूंना येत असेल. माझ्यासारख्या संस्कृतीच्या रानात शिरलेल्या एकाकी प्रवाशाला तर तो अटळच म्हणावा असा आहे. कारण संस्कृतीची वाटचाल हीच मुळी जे अज्ञात आहे ते ज्ञात करून घेण्यासाठी आहे. काळाच्या मुखावरचा युगविशिष्ट अभिप्राय हेरण्यासाठी आहे आणि काळ हा जसा कलांचा अंतःस्वर निर्धारित करणारा एक प्रभावशाली घटक आहे, तसाच तो संस्कृतीला ही विशिष्ट रूप देणारा घटक आहे. या काळाची स्मृतिचिन्हं म्हणजे कला आणि साहित्य. या अर्थाने मी प्राचीन मराठी आणि साहित्य, लोककला, लोकसाहित्य यांचा विचार करत आलो. संस्कृतीची अंतर्गत रहस्ये शोधण्यासाठी मला मदत करणारी ती साधना आहे. हिंदुस्थानी संस्कृतीची आणि हिंदुस्थानी साहित्य संस्कृती आणि धर्मेतिहासाची अनेक दालने आपल्या प्रतिभेने समृद्ध करणाऱया या गाढय़ा संशोधकाला विनम्र आदरांजली…