
माटुंगा पूर्व येथील ‘ताहेर मॅन्शन’ या 50 वर्षांपेक्षा जास्त जुन्या इमारतीची सध्या प्रचंड दुरवस्था झाली असून कोसळणारे स्लॅब, छपराला टेकू, भिंतींच्या भेगा आणि गळतीमुळे रहिवाशांचा जीव टांगणीला लागला आहे. त्यामुळे संबंधित जमीन मालक असलेल्या बिल्डरने तातडीने दुरुस्ती किंवा पुनर्विकास करावा अशी मागणी रहिवाशांमधून करण्यात येत आहे. .
फोर्टमधील भानुशाली इमारत दुर्घटनेत 10 जणांचा बळी गेल्यानंतर मुंबईतील धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यामध्ये माटुंगा येथील प्लॉट नंबर 126, तेलंग क्रॉस रोड जवळील ‘ताहेर मॅन्शन’ इमारतीची स्थितीही सध्या बिकट झाली आहे. ग्राऊंड प्लस तीन माळ्यांच्या या इमारतीला अनेक ठिकाणी टेकू लावण्यात आले आहेत. भिंतींना मोठमोठ्या भेगा गेल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी राहणाऱया सुमारे 19 मधील निम्मी कुटुंबे दुसऱया ठिकाणी राहण्यास गेली आहेत. तर पहिल्या आणि वरील माळ्यावर 3 ते 4 कुटुंबे राहत आहेत. मात्र इमारतीची सद्यस्थिती अत्यंत बिकट असल्यामुळे जमिनीचा मालक आणि बिल्डर असलेल्या विकासकाने तातडीने आवश्यक कार्यकाही करावी अशी मागणी रहिवाशी करीत आहेत. संबंधित जमीन मालक वारंवार पाठपुरावा करूनही दखल घेत नसल्याचा आरोपही रहिवासी करीत आहेत.
इमारतीच्या धोकादायक स्थितीमुळे या ठिकाणी राहण्यास भीती वाटते. त्यामुळे दोन दिवसांपूर्वीच मी दुसऱया ठिकाणी राहण्यास गेली आहे. मात्र सध्या वयोकृद्ध असल्याने आणि भाडय़ाने राहणे परवडतही नसल्याने अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे इमारतीबाबत तातडीने कार्यवाही करणे गरजेचे आहे.
– शारदा सावंत (78), रहिवासी
पालिका ‘म्हाडा’ला रिमाइंडर पाठवणार
संबंधित इमारत उपकरप्राप्त असल्यामुळे आवश्यक दुरुस्ती आणि पुनर्विकासाचे काम ‘म्हाडा’च्या माध्यमातून तातडीने होणे आवश्यक आहे. याबाबत ‘म्हाडा’ला आवश्यक कार्यवाही करण्यासाठी जूनमध्येच पत्र पाठवण्यात आले आहे. अद्याप कार्यवाही झाली नसल्यामुळे सोमवारी पुन्हा पत्र देण्यात येईल, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
























































