
कोरोनाचे संकट पाठीवर घेऊन नागरिकांनी आज जोरदार गटारी साजरी केली. सकाळी 4 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत तालुक्यात सुमारे 15 हजार किलो चिकन आणि तितक्याच प्रमाणात बोकडाच्या मटणाची विक्री झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोक गटारी साजरी करण्यासाठी बाहेर पडतील की नाही ही भीती मटण-चिकन व्यवसायिकांना होती. मात्र चिकन-मटणाच्या विक्रीने आज उच्चांक गाठल्याने गेले अनेक दिवस लॉकडाऊनमुळे व्यवसायिकदृष्ट्या हतबल झालेल्या व्यवसायिकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू फुलले.
आषाढी आमावस्या म्हणजे खरतर दीप अमावस्या. मात्र या अमावस्येचे गटारी अमावस्या असे नामकरण झालेले आहे. हा दिवस तळीरामांसाठी उत्सव असतो. खाओ-पिओ ऐश करो असं या दिवसाचे महत्व असल्याने गटारी अमावस्येला मोठ्या प्रमाणात चिकन-मटण आणि मद्याची व्रिकी होते. गेल्या अनेक वर्षाची ही परंपरा आहे. परंतु या वर्षीची परिस्थिती वेगळी आहे. देशावर आलेले कोरोनाचे संकट, त्यामुळे करण्यात आलेले लॉकडाऊन आणि सगळीकडेच असलेली आर्थिक टंचाई यामुळे यंदा गटारी साजरी केली जाईल की नाही, केली तरी मोठ्या प्रमाणात होईल की नाही असे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. मात्र आज पहाटे चार वाजल्यापासूनच चिकन आणि मटणासाठी ग्राहकांच्या रांगा लागल्या आणि गटारीबाबत निर्माण झालेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपोआपच मिळाली.
शहरातील एका चिकन व्यवसायिकाशी संपर्क साधला असता तो म्हणाला, या वर्षी कोरोनाचे संकट असल्याने पक्षी आणताना मनात थोडीशी भिती होती. मात्र सकाळी चार वाजता दुकान उघडण्यापुर्वीच दुकानाबाहेर ग्राहकांची रांग पाहिली आणि भिती कुठल्या कुठे पळाली. सकाळी 4 ते 11 या दरम्यान सुमारे 350 किलो चिकनी विक्री झाल्याचे या व्यवसायिकांने सांगितले. दुकानातील सर्व माल संपला मात्र तरीही दुकानाबाहेर ग्राहकांची लागलेली रांग संपलेली नव्हती.
मटण विक्रेत्याकडे ही ग्राहकांच्या मोठ- मोठ्या रांगा लागल्या होत्या. दुपारी 12 वाजेपर्यंत या दुकानदाराने सुमारे 30 बोकड म्हणजे 500 किलोची सागुती संपवली होती. तालुक्यात असे किमान 15 ते 20 दुकानदार आहेत. त्यामुळे गटारीच्या पार्श्वभुमीवर तालुक्यात सुमारे 10 हजार किलो सागुतीची विक्री झाली होती. आज चिकनचा दर 200 तर मटणाचा दर 640 इतका होता मात्र व्यवसायिकांच्या दुकानाबाहेरची रांग कमी होता होत नव्हती.
खेड स्थानक परिसरात असलेल्या एकमेव सुवर्णा वाईन्स या मद्याच्या दुकानात तर तळीरामांनी कालपासून गर्दी केली होती. काल आणि आज दुपारी 12 वाजेपर्यंत दुकानातून लाखो लिटरच्या दारूची विक्री झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे गटारीवर कोरोनाचा कोणताही परिणाम झाला नसल्याचे स्पष्ट झाले.



























































