
मुंबई – पुणे एक्प्रेसवर सुसाट धावणाऱ्या वाहन चालकांनो आता गाडी चालवितना जरा सबुरीने घ्या. येत्या 1 ऑगस्टपासून जर तुम्ही एक्प्रेसवर सुसाट गाडी चालविल्यास आणि दोन टोलनाक्यांमधील 50 किमीचे अंतर अवघ्या 37 मिनिटांत पूर्ण केल्यास तुम्हांला थेट 1 हजार रुपये दंडाची पावती फाटणार आहे. राज्य महामार्ग पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून 1 ऑगस्टपासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
मुंबई – पुणे एक्प्रेसवेवर वाहनांसाठी 94 किलोमीटरच्या साधारण रस्त्यांसाठी ताशी 100 वेगमर्यादा ठेवण्यात आली आहे. तर घाटाच्या 15 किमी रस्त्यांसाठी ताशी 50 इतकी वेगमर्यादा आहे. मात्र त्यानंतरही अनेक वाहनचालक या वेगमर्यादेकडे दुर्लक्ष करीत असल्याचे पोलिसांना आढळले. त्यामुळे पोलिसांनी वरील निर्णय घेतल्याची माहिती घेण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरणाच्या मदतीने या नियमाची अंमलबजावणी करण्यात येणार असून त्यासाठी लागणारी सर्व माहिती वाहतूक पोलिसांना देण्यात येईल, अशी माहिती प्राधिकरणाचे मुख्य अभियंता दिलीप उर्किडे यांनी दिली.
काय सांगतो नियम
या नव्या नियमानुसार मुंबई – पुणे एक्प्रेसवे वरील एक टोल नाका हा खालापूर नजीक आणि दुसरा टोलनाका हा उर्से जवळ आहे. या दोन्ही टोलनाक्यांमधील अंतर हे 50 किमी इतके आहे. हे अंतर 37 मिनीटाहून कमी वेळेत पार केल्यास वाहनचालकाने वेगमर्यादा पाळलेली नसल्यास त्याच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.
दंडाची रक्कम दुप्पट होणार
ई चलनाद्वारे हा दंड आकारण्यात येणार आहे. नियमानुसार प्रथम हा गुन्हा केल्यास 1000 रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. त्यानंतर दुसऱयांदा हा गुन्हा केल्यास दंडाची रक्कम दुप्पट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.



























































