
हिंदुस्थान आणि चीनच्या सीमारेषेवर चीनच्या कुरघोडींवर आता ड्रोनची नजर असणार आहे. यासाठी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) खास ‘भारत’ नामक ड्रोनची निर्मिती केली असून हा ड्रोन चीनच्या कुरघोड्यांवर नजर ठेवणार आहे. हा ड्रोन हिंदुस्थानी सैन्य दलाकडे स्वाधीन करण्यात आला आहे. लडाख येथील हिंदुस्थानी चीन सीमारेषेवरील असलेल्या पर्वतरांगा आणि उंच भागात हा ड्रोन शत्रूंवर नजर ठेवण्यास उपयुक्त ठरणार आहे.
हिंदुस्थान आणि चीन सीमारेषेवर वाढत असलेला तणाव लक्षात घेता काही दिवसांपूर्वी हिंदुस्थानी सैन्यदलाने लडाख आणि आसपासच्या भागात लक्ष ठेवण्यासाठी डीआरडीओकडे ड्रोनची मागणी केली होती. गेल्या अनेक दिवसांपासून चीनकडून कोणत्या कोणत्या खुरापती काढल्या जात होत्या. त्यामुळे ड्रोनचा वापर महत्त्वाचे असल्याचे मत सैन्य दलाकडून व्यक्त करण्यात आले होते. अखेर सैन्य दलाच्या मागणीनुसार डीआरडीओच्या चंदीगढ येथील प्रयोगशाळेत भारत नामक ड्रोन तयार केला आहे.
काय आहेत ड्रोन्सची वैशिष्ट्ये
- हा ड्रोन अत्यंत थंड हवामानातदेखील काम करू शकतो
- रात्री अंधारातदेखील शत्रूंवर नजर ठेवू शकतो.
- अत्याधुनिक कॅमेरा या ड्रोनमध्ये बसविण्यात आला असून जंगलात लपून बसणारा शत्रूदेखील हा ड्रोन सहज ओळखू शकणार आहे.
- गर्दीच्या ठिकाणी देखील हा ड्रोन शत्रूची ओळख पटवू शकतो.
- हा विश्वातील सर्वात चपळ आणि वजनाने एकदम हलका ड्रोन आहे.
शत्रूंना ओळखणार
या ड्रोनबद्दल डीआरडीनो दिलेल्या माहितीनुसार हा ड्रोन अत्यंत अचूक माहिती हिंदुस्थान सैन्य दलापर्यंत पोहचवू शकणार आहे. हा ड्रोन रडारच्या नियत्रंणात येण्याची शक्यता देखील कमी आहे. हा ड्रोन आकाराने लहान असला तरी तो अत्यंत शक्तिशाली असल्याचे सांगण्यात येते. या ड्रोनमध्ये अत्याधुनिक रिलीज टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे लडाखसारख्या भागात हा ड्रोन काम करु शकणार असून या तंत्रज्ञानामुळे शत्रू आणि मित्र या दोघांची ओळख करु शकणार आहे.

























































