उड्डाणपुलाची दुसरी भिंतही धोकादायक एका बाजूची वाहतूक बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कणकवली शहरातील उड्डाणपुलाला जोडणाऱ्या भिंतीचा दुसरा भागदेखील धोकादायक झाला असून तो कधीही कोसळण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर  हॉटेल मंजूनाथ ते एस.एम.हायस्कूल
अंडरपासपर्यंतचा रस्ता सील करण्यात आला आहे. त्या मार्गावरील वाहतूक वळविण्यात आल्याने शहरात वाहतूक कोंडीही निर्माण झाली आहे.

शहरातील एस.एम. हायस्कूल नजीक उड्डाणपुलाला जोडणारी भिंत गेल्या आठवड्यात कोसळली होती. या भागाची डागडुजी ठेकेदाराकडून सुरू आहे. त्यानंतर आता या भिंतीचा दुसऱ्या बाजूचे सिमेंट बॉक्स बाहेर आले असून ही भिंतदेखील कधीही कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. ही बाब ठेकेदार तसेच महामार्ग अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर हॉटेल मंजूनाथ ते एस.एम. हायस्कूल अंडरपास हा भाग सील करण्यात आला आहे, तर वाहनांसह पादचाऱ्यांनाही तेथे जाण्यास अटकाव करण्यात येत आहे.

सर्व्हिस रोडवरील वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आल्याने दुसऱ्या बाजूच्या सर्व्हिस रोडवरून वाहनांची ये-जा केली जात आहे. तसेच महामार्गावरील वाहतूक मसूरकर किनई रोड तसेच भालचंद्र आश्रम रोडवरून वळवण्यात आली आहे. हे दोन्ही रस्ते अरुंद असल्याने महामार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी निर्माण होत आहे.