
पबजी या मोबाईल गेममुळे काही तरुणांचे मानसिक आरोग्य बिघडल्याच्या आणि काहींनी नैराश्य आल्याने आत्महत्या केल्याच्या बातम्या आपण वाचल्या आहे. मात्र याच खेळाचा वापर करून एका तरुणाने पूरग्रस्तांसाठी 10 लाख रुपयांची मदत उभी केली आहे. युट्युबवरील प्रसिद्ध चेहरा असलेल्या अजय नागर उर्फ कॅरीमिनाटी याने ही रक्कम जमा केली आहे. ही रक्कम बिहार आणि आसाममधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देत असल्याचे नागरने जाहीर केले आहे.
आशय निर्मिती ही कमाईसाठी केली जाऊ शकत नाही असं नागरचं म्हणणं आहे. आशय निर्मिती ही एका व्यक्तीच्या फायद्यासाठी असते. व्यवसाय करत असताना त्याद्वारे समाजाचे भले करता येऊ शकले तर त्याचा फायदा आहे असं तो म्हणतो. नागरचा भाऊ आणि व्यवस्थापक दिपक चार याने त्याला पबजी खेळून निधी गोळा करण्याची कल्पना सुचवली होती. त्यानुसार त्याने ही रक्कम जमवली आणि त्यामध्ये स्वत:चे एक लाख रुपये घालत 11 लाख 31 हजार रुपयांचा निधी त्याने पूरग्रस्तांसाठी दान केला.
अजय नागर याने निधी जमा करण्यासाठी Ghost of Tsushima , Pacify आणि PUBG खेळण्याचं ठरवलं होतं. हे गेम खेळत असताना 90 हजार दर्शक ऑनलाईन होते. नागर याने कॅरीमिनाटी नावाने 2014 मध्ये युट्युब चॅनेलला सुरुवात केली होती. बिग बॉस, ढिंच्यॅक पूजा, दीपक कलाल यांच्यावर सडकून टीका करणारे त्याचे व्हिडीओ नेटीझन्सना आवडले होते. तिथपासून त्याची प्रसिद्धी वाढीस लागली होती. त्याच्या युट्युब चॅनेलचे सध्या 24 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.
























































