कपिल शर्मा शो… पुन्हा हसवण्यासाठी तयार, प्रेक्षक मात्र कटआऊट!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विनोदाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा द कपिल शर्मा शो..हा रियालिटी शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कोरोनामुळे बंद पडलेल्या या शो चा नवा भाग नुकताच चित्रीत करण्यात आला असून हा नवा भाग 1 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या भागाचे वैशिष्टय़े म्हणजे, प्रेक्षकांशिवाय हा भाग चित्रीत करण्यात आला असून प्रेक्षकांऐवजी त्यांचे कटआऊट वापरण्यात येणार आहेत. टेलिव्हिजनच्या इतिहासात अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग असणार आहे.

कोरोनाचा फटका चित्रपट आणि टेलिव्हिजन क्षेत्राला देखील बसला होता. त्यामुळे गेल्या चार महिन्यांपासून मालिकेचे चित्रीकरण बंद होते. आता लॉकडाऊन ओपन होताना सरकारने नियमावली जाहीर करीत चित्रीकरणाला परवानगी दिली आहे. त्यानुसार अनेक नियमांची पूर्तता करत जवळपास सर्वच मालिकांचे चित्रीकरण नव्याने सुरु करण्यात आले असून कपिल शर्मा शो च्या चित्रीकरणालादेखील सुरुवात झाली आहे. लॉकडाऊननंतरचा पहिला भाग नुकताच चित्रीत करण्यात आला आहे. नियमानुसार कमीत कमी लोकांच्या उपस्थितीत हे चित्रीकरण पूर्ण करण्यात आले आहे. या शो मध्ये प्रेक्षकांची उपस्थिती ही मोठय़ा प्रमाणावर असते. अनेकवेळा येणाऱया सेलिब्रेटींना प्रश्न विचारण्याची संधीदेखील या शोमध्ये दिली जात होती. आता मात्र नियमानुसार चित्रीकरण सुरु करण्यात आले असल्याने यात प्रेक्षकांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. त्याऐवजी त्यांचे कार्ड बोर्डचे कटआऊट वापरण्यात येणार आहेत. साधारण 50 ते 60 प्रेक्षकांचे कटआऊट वापरण्यात आले आहे. अभिनेत्री अर्चना पूरण सिंह या एकमेव या कटआऊटच्या प्रेक्षकांमध्ये बसणार आहे. तिच्या शेजारी इतर सर्व प्रेक्षक हे कट आऊट स्वरूपात असणार आहेत.

पहिल्या भागामध्ये झळकणार सोनू सूद
द कपिल शर्मा शो …लॉकडाऊननंतर पहिला एपिसोड नुकताच चित्रीत करण्यात आला आहे. या पहिल्या भागमध्ये सेलिब्रेटी म्हणून अभिनेता सोनू सूद याला आमंत्रित करण्यात आले होते.