‘चेक इन अॅप’ एण्ट्री! छापिल पीआर‌एस तिकीटांची तपासणी करणारे तंत्रज्ञान विकसित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रेल्वेने विकसित केलेल्या एका अॅपमुळे ‘पीआर‌एस’च्या छापिल तिकीटांची देखील दूर अंतरावरून तपासणी करणे आता शक्य झाले आहे. आतापर्यंत केवळ युटीएस ई-तिकिटांचा ‘क्यूआर’ कोड तपासणे मोबाईलने शक्य होत होते, परंतू नव्या ‘चेक इन अॅप’ मुळे छापिल लांब पल्ल्याच्या ‘पीआर‌एस’ तिकिटांची तपासणी करणे शक्य झाले आहे.

मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर प्रवाशांची तिकीट तपासणी सुरक्षित अंतरावरुन करणे शक्य झाले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी ‘सोशल डिस्टन्सिंग’ पाळण्याचे आव्हान टीसी आणि सुरक्षारक्षक इतर स्टाफवर आहे. त्यामुळे योग्य अंतरावरुन तिकीट तपासणी निर्धोकपणे व्हावी यासाठी मध्य रेल्वेने ‘चेक इन मास्टर’ नावाचे अॅप विकसित केले आहे. हे अॅप टीसींच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करण्यात आले आहे. त्यामुळे पीआरएस आणि यूटीएस तिकिटांची तपासणी ‘विनास्पर्श’ करता येणे शक्य झाले आहे. या ‘चेक इन मास्टर’ अ‍ॅपने हजेरी घेणे आणि तिकीट तपासणी कर्मचार्‍यांची ‘रिअल टाइम मॉनिटरिंग’ करणेही सोपे होणार आहे. तसेच टीसींना थर्मल स्क्रिनिंग तपासणीसाठी थर्मल गनही पुरविण्यात आली आहे.

मेट्रोप्रमाणे ‘फ्लॅप गेट’ने प्रवेश

मध्य रेल्वेच्या लांबपल्ल्याच्या टर्मिनसवर लवकरच मेट्रोप्रमाणे ‘फ्लॅप गेट’ने ‘क्यूआर’ स्कॅन करून प्रवेश देण्यात येणार आहे. सुरुवातीला मध्य रेल्वेच्या लांबपल्ल्याच्या गाड्या सुटणाऱ्या ‌टर्मिनसवर ‘फ्लॅप गेट’ बसविण्याची योजना आहे. हे काम मेसर्स रूरल इलेक्ट्रीफिकेशन कॉर्पोरेशन लिमिटेड ही कंपनी ‘सीआर‌एस’ फंडातून करणार आहे. सुरूवातीला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व‌ नंतर लोकमान्य टिळक टर्मिनस आणि ठाणे येथे असे ‘फ्लॅप बेस गेट’ बसविण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.

तिकिटांची मोबाईलवर प्रतिमा घेऊन ‘ओसीआर आणि क्यूआर’ अशा दोन्ही प्रकारच्या कोडचे स्कॅनिंग दूरुनही करता येत शक्य झाल्याने टीसींना आपले कर्तव्य बजावत येणार असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सूतार यांनी सांगितले.