
छळवणुकीप्रकरणी सुनेने केलेली तक्रार मागे घेण्यासाठी तिच्यावर दबाव टाकून तिची हत्या करणाऱया बोईसरच्या फरार ‘झा’ कुटुंबाच्या मुसक्या हरयाणामधून पोलिसांनी आवळल्या. दोन दिवसांपूर्वी खोलीतील प्लॅस्टिक ड्रममध्ये या सुनेचा मानवी सांगाडा सापडल्याची धक्कादायक बाब गणेशनगरात समोर आली होती. त्यानंतर या घरात भाडेकरू म्हणून राहणारे ‘झा’ कुटुंबीय फरार होते. त्यांना बोईसर एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले.
बोईसर पूर्व गणेशनगर येथील लोकेश जैन यांनी अनधिकृतरीत्या बांधलेल्या व भाडय़ाने दिलेल्या चाळीतील खोलीत निळ्या ड्रममध्ये मानवी सांगाडा आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. या ठिकाणी पवन झा, बच्चुदेवी झा, दीपक झा, नितू ठाकूर यांसोबत बुलबुल झा राहात होत्या. बुलबुल व दीपक यांचा विवाह झाला होता. मात्र बुलबुलच्या तक्रारीवरून 2019 मध्ये घरातील चौघांवर तिचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी अटक होऊन सहा महिन्यांनी या चारही आरोपींना जामीन मिळाला. कोर्टात तडजोड करून केस मागे घेण्यासाठी बुलबुलवर दबाव टाकण्यात येत होता. यासाठी तिचा छळ सुरू होता. त्यातूनच आरोपींनी तिची हत्या करून मृतदेह ड्रममध्ये भरून रूममधील बाथरूमच्या वरच्या बाजूला ठेवला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे यांच्या टीमने या प्रकरणात फरार झा कुटुंबातील चार सदस्यांना हरयाणाच्या गुरुग्राममधून अटक केली.
























































