
राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढ आहे. आज दिवसभरात 5714 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. हे प्रमाण 55.99 टक्के झाले असून 1 लाख 99 हजार 967 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज कोरोनाच्या 9615 नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात 1 लाख 43 हजार 714 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
राज्यात आज 278 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 3.7 टक्के एवढा आहे. मृत्यूंमध्ये मुंबई मनपा-54, ठाणे-4, ठाणे मनपा-7, नवी मुंबई मनपा-10,कल्याण-डोंबिवली मनपा-13, उल्हासनगर मनपा-4, भिवंडी निजामपूर मनपा-2, मीरा-भाईंदर-16, वसई-विरार मनपा-4 तर अन्य राज्यातील एकाचा समावेश आहे.
मुंबईत 1,062 नवे रुग्ण, 54 जणांचा मृत्यू
मुंबईत आज कोरोनाचे 1,062 नवे रुग्ण सापडले असून गेल्या 48 तासांत 54 जणांचा मृत्यू झाला आहे तर गेल्या 24 तासांत 1,158 जण कोरोनामुक्त झाले असून मुंबईत एकूण कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या आता 78 हजार 260 वर पोहोचली आहे. मुंबईत 54 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या आता 5 हजार 981 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 73 टक्क्यांवर आले असून मुंबईत सक्रीय रुग्णांची संख्या 22 हजार 647 इतकी आहे. मुंबईत कोरोनाच्या आतापर्यंत 4 लाख 62 हजार 721 चाचण्या झाल्या असून रुग्णांची संख्या 1 लाख 6,891 वर पोहोचली.
























































