खुनाच्या गुन्ह्यातील दोन आरोपींचे बेड्यांसह पलायन; एकाला अटक, दुसऱ्याचा शोध सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
thief-ran-jail

सोन्याच्या दागिन्यांच्या मागणीवरुन वाद झाला त्यातून झालेल्या खून प्रकरणातील दोन आरोपींनी बेड्यांसह पोलिसांच्या ताब्यातन पलायन केल्याची घटना शनिवारी रात्री श्रीरामपूरमध्ये घडली. पोलिसांनी सिसगाव शिवारात त्यातील एकाला पकडले असून दुसऱ्या आरोपीचा शोध सुरु आहे. खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी सचिन काळे (रा. मुठेवाडगाव) व भौदू भोसले (रा.कानडी,ता.आष्टी) हे दोघे न्यायालयीन कोडठीत आहेत. रात्री त्यांनी पोट दुखत असल्याने सांगितल्याने त्यांना पोलिसांनी उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात नेले होते. तेथे त्यांनी पोलिसांच्या हाताला हिसका देत त्यांनी बेड्यांसह पलायन केले. पोलिसांनी पाठलाग करुन भोसलेला सिरसगाव शिवारात बेडीसह पकडले. तर काळे खानापूर शिवारात पसार झाल्याचे समजते. त्याचा शोध घेण्यासाठी दोन पोलीस पथके रवाना झाली असून शहर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे.

मुठेवाडगाव शिवारात 8 मार्च 2020 रोजी मध्यरात्री लोंखडी पाईप व तलवारीने वार करुन मयुर काळे (वय 28) याचा खून झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी तालुका पोलिसांनी चौघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली होती. वडिलांच्या निधनानंतर मुलीने पतीला माहेरी आणून आईसोबत राहणे पसंत केल्यामुळे मयुर हा पत्नीसोबत पाच वर्षांपासून मुठेवाडगाव येथे राहत होता. काही दिवसांनंतर आईने गावातीलच सचिन काळे याच्यांशी दुसरा विवाह करुन मुलीला सोडले. मुलीकडे असलेल्या दागिन्यांच्या मागणीसाठी आईने पती सचिन याला मित्रांसोबत मुलीकडे पाठविले. त्यावेळी सचिन, भोसले, संदिप काळे, सुरज काळे (रा. भेंडाळा, ता. गंगापूर) हे मयुरकडे गेले. तेथे त्यांनी मयुर व पत्नी मोनिकाकडे दागिन्याची मागणी केली. याप्रसंगी चौघेही सर्व दारुच्या नशेत असल्याने वाद झाला. त्यात मयुरला गंभीर मारहाण झाल्याने तो मरण पावला. मारहाणीत मोनिकाही जखमी झाली.

मोनिकाने दिलेल्या तक्रारीवरुन तालुका पोलिसांनी सचिन, संदिप, सुरज व भोसले विरोधात खुनाचा गुन्हा नोंदविला होता. पोलिसांनी शोध घेत सचिन, सूरज व भौदू याला गजाआड केले होते. यापुर्वीही ग्रामीण रुग्णालयात गंभीर गुन्ह्यातील एका आरोपीला उपचारासाठी आणले असता त्यानेही पोलिसांची नजर चुकवत पलायन केले होते.