अभिनेता वैभव मांगलेची ‘ही’ कला पाहून तुम्ही थक्क व्हाल!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेता वैभव मांगले अभिनयाद्वारे महाराष्ट्रातील रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. विनोदी अभिनेता म्हणून खळखळून हसवताना, चिंची चेटकीण बनून बाल रसिकांच्या मनातही तो तितक्याच सहजतेने उतरतो. अभिनेता, गायक या वैभवच्या कलात्मक बाजू रसिकांना सर्वश्रुत आहे. मात्र त्याची तितकीच आणखी एक प्रतिभाशाली कलात्मक बाब रसिकांना माहीत नसेल. हो, वैभव एक उत्कृष्ट चित्रकारही आहे! रंगदेवतेने ही आणखी एक कला त्याला अगदी उत्तमरित्या बहाल केली आहे. सध्या तो या रंगांच्या, चित्रांच्या दुनियेत रंगून गेला आहे.

वैभव मांगले लॉकडाऊनमध्ये कोंकणात रत्नागिरी जिल्ह्यातील, संगमेश्वर तालुक्यातील कासार-कोळवण या त्याच्या मूळ गावी अडकून पडला आहे. मात्र हा वेळ तो सत्कारणी लावत आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत तो “चित्रकला” जोपासत आहे. चित्र काढण्यासाठी त्याच्याकडील कागद संपल्याने त्याने आता घरातील विविध पुरातन वस्तूंवर, घराजवळून वाहणाऱ्या नदीतील दगडांवर चित्र काढण्यास सुरुवात केली आहे. त्याच्या रॉक पेंटिंगबद्दल एक वेगळेपण आढळून येते. तो घेतला दगड आणि लागले त्यावर रंगवायला असे होत नाही. तर तो त्या दगडातील आकार जाणून घेतो आणि मग त्यानुसार त्याला रंगवताना दिसतो. ही बाब निश्चितच वैशिष्ट्यपूर्ण ठरते. रॉक पेंटिंगबरोबर त्याने घरातील आपला लहानपणीच्या पाळण्याला, जुन्या पेटाऱ्याला, विविध फळ्यांना रंग दिले आहेत. यावरही त्याने खूपच सुंदर चित्रे काढली आहेत. जी आपल्याला थक्क करतात.

70887857-fae8-45ff-bcdb-d0f6379b7502

त्याच्या चित्रांत वैविध्यता दिसून येते. पशुपक्षी, निसर्गचित्र अशी विविध चित्रे त्याच्या कुंचल्यातून चितारली आहेत. या चित्रांची वैशिष्ट्ये म्हणजे उत्तम स्वरूप, उत्तम रंगसंगती आणि त्या चित्रांतील भावविश्व तो खूप उत्तमप्रकारे मांडत आहे. तुम्हीही वैभवची चित्र पाहून थक्क होऊन जाल. येत्या काही दिवसांत वैभवाच्या चित्रांचे प्रदर्शन भरल्यास निश्चितच नवल वाटायला नको. खऱ्या अर्थी त्याच्यावर “रंगदेवता” प्रसन्न आहे, असं म्हणायला हरकत नाही.

8ff1c74e-d0fb-40c5-be1d-9b9864647700

त्याच्यातील ही चित्रकला त्यालाही अचानकपणे उमगली. जुलै महिन्यापासून त्याने आपल्या या कलेला अधिक मोकळी वाट करून दिली…आणि त्याचे त्याला उमगले की मी चित्रही उत्तम चितारु शकतो. मग त्याने जाणीवपूर्वक, अभिनयाच्या दुनियेतून वेळ काढून चित्रांनाही वेळ द्यायला सुरुवात केली. जुलै महिन्यापासून आतापर्यंत त्याच्या कुंचल्यातून अनेकविध चित्रे कॅनव्हासवर साकारलीही आहेत. एक दिवस वैभवच्या चित्रांचे प्रदर्शन नक्की भरेल यात शंका नाही.