
राज्यात दूध दरवाढीवरून भाजपने पुकारलेले आंदोलन म्हणजे पुतना मावशीचे प्रेम आहे, अशी जोरदार टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे. भाजपच्या नेत्यांनी आज राज्यात विविध ठिकाणी दूध दरवाढीवरून आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाचा समाचार घेताना राजू शेट्टी यांनी भाजपला धारेवर धरले. भाजपला दूध दरवाढीवरून आंदोलन करण्याचा अधिकार नाही. कारण भाजपच्या काळात दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला होता. फक्त राज्य सरकारच्या विरोधात हे आंदोलन असेल तर ही दूध उत्पादकाची फसवणूक आहे.
भाजपने पुकारलेले आंदोलन हे पुतना मावशीचे प्रेम आहे. कारण ठोस उपाययोजना करण्याचे काम केंद्र सरकारचे आहे. केंद्राने आयात थांबवत निर्यातीला सबसिडी दिली पाहिजे. जीएसटी मागे घेतला तर दूध उत्पादकांना मोठा दिलासा मिळेल. त्याच वेळेस राज्य सरकारने तातडीने दूध उत्पादक शेतकर्यांच्या खात्यात प्रतिलिटर पाच रुपये जमा करावे हाच सध्याच्या घडीला महत्त्वाचा तोडगा आहे असे सांगितले. या संदर्भात राज्य सरकारने पावले उचचली नाही तर राज्यात तीव्र आंदोलन पुकारण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

























































