
मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुंबईकरांच्या सेवेसाठी 12 रुग्णवाहिका नुकत्याच दाखल झाल्या आहेत. शिवसेना खासदार, माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली महानगर टेलिफोन निगममधील कामगार संघाच्या वतीने देणगीरूपाने जमा झालेल्या निधीच्या माध्यमातून या रुग्णवाहिका प्रदान करण्यात आल्या आहेत. ‘जाणीव ट्रस्ट ’च्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला होता.
या रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा नुकताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे संपन्न झाला. याप्रसंगी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब, महापौर किशोरी पेडणेकर, शिवसेना विभागप्रमुख आशीष चेंबूरकर व पांडुरंग सकपाळ, महिला आघाडी विभाग संघटक जयश्री बाळ्ळीकर, महानगर टेलिफोन निगम कामगार संघाचे सरचिटणीस दिलीप जाधक व कार्याध्यक्ष प्रकाश शिरवाडकर, लोकाधिकारचे सरचिटणीस बाळा साटम, खजिनदार मारुती साळुंखे आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.























































