महावितरण म्हणते, लॉकडाऊनमध्ये एकाही ग्राहकाची वीज कापली नाही!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वीज बिल न भरल्याने लॉकडाऊनच्या काळात एकाही घरगुती ग्राहकाची वीज कापलेली नाही. तसेच वीज बिल भरण्याबाबत ग्राहकांना तगादाही लावला नसल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.

घरगुती वीज ग्राहकांना महावितरणने अवाच्या सवा वीज बिले पाठवली आहेत. तसेच सदर बिले न भरल्यास वीज कापणार असल्याची धमकी महावितरणकडून दिली जात असल्याचा आरोप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्याचे महावितरणने खंडन केले असून लॉकडाऊन काळात एकाही घरगुती वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला नसल्याचे महावितरणच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने सांगितले. तसेच वाढीव वीज बिलाबाबत ज्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत, त्यांना बिल समजावून सांगितले जात आहे. त्याचबरोबर ग्राहकाची तक्रार योग्य असेल तर बिलमध्ये दुरुस्ती केली जात आहे. मात्र महावितरण वीज कनेक्शन कापत असलेल्या आरोपात तथ्य नसल्याचे स्पष्ट केले आहे.