
अयोध्येत 5 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते प्रभू श्रीरामाच्या मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. यानिमित्ताने देशभरात उत्साहाचे वातावरण असून उत्तर प्रदेशमध्ये जोरदार तयारी सुरू आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेत आहे. अयोध्येत ठिकठिकाणी सजावट केली जात असून भूमिपूजनाच्या दिवशी रामलल्लाला घातली जाणारी मखमली वस्त्र देखील तयार आहेत.

भूमिपूजनाच्या तीन दिवस आधीच वस्त्र शिवून तयार झाली असून मुख्य पुजारी सतेंद्र दास यांच्याकडे वस्त्र आणि ध्वज सोपवला आहे. ही वस्त्र शिवण्याचे काम गेल्या 4 पिढ्यांपासून करणाऱ्या व्यक्तीलाच देण्यात आले होते. अयोध्येतील भागवत टेलर यांना हा मान मिळाला असून यात त्यांनी कोणतीही कसर सोडलेली नाही.

प्रभू श्रीरामासह लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि रामभक्त, महाबली हनुमानाचे वस्त्र देखील शिवून तयार आहेत. या दिवशी मंदिरावर ‘जयश्रीराम’ची पताका फडकणार असून ती देखील शिवून तयार आहे. भूमिपूजनाच्या दिवशी पंतप्रधान मोदींच्या हस्ते चांदीची वीट रचली जाताच मंदिरावर ही पताका फडकवली जाईल.

दरम्यान, भूमिपूजनाच्या दिवशी रामलल्लाला घातली जाणार वस्त्र मखमली असून यात नऊ प्रकारचे रत्न जडलेले आहेत. हिरव्या रंगाची ही वस्त्र आहेत. तसेच प्रभू श्रीरामासाठी हिरव्या रंगाचा बिछाना देखील तयार आहे.























































